गणरायाच्या उत्सवात पोलिसांचा तंत्रज्ञानाचा पहारा : गुन्हेगारांवर एआयची नजर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गणरायाच्या उत्सवाला गालबोट लागू नये आणि गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. सराईत गुन्हेगार आणि समाजकंटकांवर कारवाई करतानाच तडीपार गुन्हेगारांच्या हालचालींवर आता अत्याधुनिक एआय सर्व्हेलन्स सीसीटीव्ही कॅमेरा व्हॅनद्वारे नजर ठेवली जाणार आहे.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांनी संयुक्तपणे प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या ६१५ सराईत गुन्हेगारांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ व १२९ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या ३९ सराईत गुन्हेगारांना कायदेशीर प्रक्रियेनुसार जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शांतता भंग होण्याची शक्यता असलेल्या १ हजार ७६१ संशयित इसमांविरुद्ध BNSS कलम १६३ (२) अंतर्गत मिनी तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या दोन कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करून त्यांना कारागृहात पाठविण्यात आले आहे.
तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची छायाचित्रे, चेहरे आणि संबंधित माहिती चंद्रपूर पोलीस दलाच्या एआय आधारित सर्व्हेलन्स सीसीटीव्ही कॅमेरा व्हॅनच्या प्रणालीमध्ये नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे हद्दपारीचा कालावधी सुरू असताना कोणताही तडीपार गुन्हेगार विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करताना किंवा फिरताना कॅमेऱ्याच्या कक्षेत आल्यास फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याची ओळख पटविण्यास मदत होणार आहे.
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटकांवर पोलिसांची नजर अधिक प्रभावी होणार आहे.
गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून गणरायाचा उत्सव भक्तिभावाने आणि शांततेत साजरा करावा. तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.




Petrol Price




