महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना सैनिकी विद्यालयात कायदेविषयक शिक्षण शिबिर


- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध कायदे व विधी सेवा योजनांची माहिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्या वतीने गोंडवाना सैनिकी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचिरोली येथे २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाल अध्यक्ष म्हणून विद्यालयचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे, अ‍ॅड. एन. के. जुमनाके, उप-मुख्य न्यायरक्षक, न्यायरक्षक कार्यालय, गडचिरोली व अ‍ॅड. एस. ए. मेश्राम, सहाय्यक न्यायरक्षक, न्यायरक्षक कार्यालय, गडचिरोली हे होते. विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करणे, त्यांना आपल्या हक्कांची माहिती करून देणे तसेच विविध विधी सेवा योजनांचा लाभ कसा घेता येतो, याबाबत मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

या शिबिरासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान किमान कार्यक्रम माहे सप्टेंबर-२०२६ अंतर्गत विविध कायदेविषयक जनजागृती विषय निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांना कायद्याच्या विविध पैलूंची माहिती देण्यात आली.

बालकांचे हक्क व कायदेशीर संरक्षणावर यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले शिबिरामध्ये NALSA (Child Friendly Legal Services for Children) Scheme, २०२४ अंतर्गत बालकांसाठी उपलब्ध असलेल्या मैत्रीपूर्ण विधी सेवांची माहिती देण्यात आली. तसेच Legal Literacy Camp on Victim Compensation Scheme अंतर्गत पीडित व्यक्तींना उपलब्ध असलेल्या नुकसानभरपाईच्या तरतुदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

याशिवाय Protection of Children from Sexual Offences Act, २०१२ (POCSO Act) या महत्त्वपूर्ण कायद्याची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, अशा प्रसंगी घ्यावयाची काळजी, कायदेशीर मदत आणि संरक्षणाच्या उपलब्ध तरतुदी याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.

शिवाय महिलांची सुरक्षितता आणि विविध विधी सेवा योजनांची माहिती शिबिरामध्ये समाजातील महिलांची सुरक्षितता व गोपनीयता या विषयावरही मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना कायद्याने दिलेले संरक्षण, सुरक्षिततेचे अधिकार आणि आवश्यकतेनुसार उपलब्ध असलेल्या कायदेशीर मदतीविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

तसेच NALSA DAWN, ASHA & SHIKSHA Scheme, २०२५ याबाबत माहिती देण्यात आली. समाजातील गरजू व्यक्तींना विधी सेवा उपलब्ध करून देणे, कायद्याविषयी जनजागृती करणे आणि नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे या दृष्टीने अशा योजनांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. प्रसंगी राष्ट्रीय विधी सहाय्य हेल्पलाइनची माहिती सुद्धा देण्यात आली यावेळी NALSA चा National Legal Aid Helpline क्रमांक १५१०० याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. गरजू व्यक्तींना कायदेशीर मदत मिळविण्यासाठी उपलब्ध असलेल्या या सुविधेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. तसेच NALSA Portal आणि महत्त्वाच्या ठिकाणी NALSAच्या विधी सहाय्याबाबत माहिती प्रसिद्ध करण्याच्या उपक्रमाचीही माहिती देण्यात आली.

कायदा, हक्क आणि कर्तव्ये यांची योग्य माहिती असणे हे जागरूक नागरिकत्वासाठी आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही कायदेशीर अडचणीच्या प्रसंगी घाबरून न जाता उपलब्ध असलेल्या योग्य विधी सेवांची मदत घ्यावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

सदर कायदेविषयक शिक्षण शिबिरात अ‍ॅड. एन. के. जुमनाके, उप-मुख्य न्यायरक्षक, न्यायरक्षक कार्यालय, गडचिरोली व अ‍ॅड. एस. ए. मेश्राम, सहाय्यक न्यायरक्षक, न्यायरक्षक कार्यालय, गडचिरोली  यांनी उपस्थितांना वरील विषयांवर मार्गदर्शन केले.

त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना कायद्याची मूलभूत माहिती, बालकांचे हक्क, महिलांचे संरक्षण, पीडितांना मिळणारी मदत तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध असलेल्या कायदेशीर सुविधांविषयी अधिक सुस्पष्ट माहिती मिळाली.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी एस. के. चुधरी, कनिष्ठ लिपीक, तसेच शिल्पा एन. गेडाम, शिपाई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या आयोजनाशी संबंधित आवश्यक नियोजन व समन्वय करण्यात आला.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग -
गोंडवाना सैनिकी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कायदेविषयक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक शिक्षण शिबिर हे केवळ माहितीपर कार्यक्रम न राहता त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध कायदेशीर बाबी समजून घेण्याची संधी ठरले.

बालकांचे अधिकार, महिलांची सुरक्षितता, पीडितांना मिळणारी नुकसानभरपाई, POCSO कायदा, विधी सहाय्य आणि NALSA हेल्पलाइन क्रमांक १५१०० यांसारख्या विषयांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या कायदेविषयक ज्ञानात भर पडली.

विद्यार्थ्यांना कायद्याची जाणीव करून देणे म्हणजे त्यांना केवळ हक्कांची माहिती देणे नव्हे, तर जबाबदार, जागरूक आणि कायद्याचा आदर करणारे नागरिक घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या दृष्टीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे कायदेविषयक शिक्षण शिबिर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक व उपयुक्त ठरले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.राकेश चडगुलवार यांनी केले तर आभार ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र म्हशाखेत्री यांनी मानले.  





  Print






Related Photos