रोट्रॅक्ट क्लब ऑफ वरोराचा स्तुत्य सामाजिक उपक्रम!


- जुन्या बसथांब्याला दिले नवे रूप; स्वच्छतेतून जपली सामाजिक बांधिलकी!
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा–वणी रोडवरील द्वारकादीश लॉनसमोरील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित व बंद अवस्थेत असलेल्या बसथांब्याचे रोट्रॅक्ट क्लब ऑफ वरोरा यांच्या वतीने स्वच्छता, रंगरंगोटी व सुशोभीकरण करून नूतनीकरण करण्यात आले. अनेक वर्षांपासून अस्वच्छता आणि झाडाझुडपांमुळे खराब झालेल्या या बसथांब्याची स्वच्छता करण्यात आली. तसेच रंगरंगोटी करून आकर्षक बॅनर लावण्यात आले.
या उपक्रमामुळे बसथांब्याला नवे रूप मिळाले असून प्रवाशांसाठी परिसर अधिक स्वच्छ आणि सुटसुटीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वच्छ परिसर, सुंदर वरोरा आणि सामाजिक बांधिलकी या भावनेतून रोट्रॅक्ट क्लब ऑफ वरोराने हा उपक्रम राबविला. समाजाच्या गरजा ओळखून प्रत्यक्ष कृतीतून सकारात्मक बदल घडवून आणणे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमाला रोट्रॅक्ट क्लब ऑफ वरोराचे अध्यक्ष Rtr. विकी आगलावे, उपाध्यक्ष Rtr. श्रेयांस फलोदिया तसेच नितीन भोजेकर, हिमांशू केशवानी, सुमित पारखी, पियूष जिवतोडे, आदित्य ठाकरे आणि यश लोनकर यांची उपस्थिती लाभली. यासोबतच रोट्रॅक्ट क्लब ऑफ औरंगाबाद, सूरत, पुणे आणि जालना येथील रोट्रॅक्टर्सनीही उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाला सहकार्य केले. या उपक्रमातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि देखभाल ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला.




Petrol Price




