संडे ऑन सायकलला गडचिरोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद


- राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकल रॅली , विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि सायकलप्रेमींचा मोठा सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा कार्यालय, गडचिरोली आणि सायकल स्नेही मंडळ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ३० ऑगस्ट संडे ऑन सायकल सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. इंदिरा गांधी चौक ते क्रीडा प्रबोधिनी, पोटेगाव रोड या मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रॅलीचा शुभारंभ नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबाळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी घाटोळे, सायकल स्नेही मंडळाचे जिल्हा सरचिटणीस उदय धकाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सामाजिक कार्यकर्ते उपेंद्र रोहनकर, प्रा. सुनीता साळवे, सुचिता धकाते आदी उपस्थित होते.
सायकलिंगमुळे आरोग्य आणि पर्यावरणाचे संवर्धन -
रॅलीत सहभागी विद्यार्थी, नागरिक आणि सायकलप्रेमींना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबाळकर यांनी सायकल चालविण्याचे आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित केले. नियमित सायकल चालविल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. त्याचबरोबर इंधनाचा वापर कमी होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत नागरिकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असून, दैनंदिन जीवनात शक्य तितका सायकलचा वापर वाढवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपक्रम -
महान हॉकीपटू स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. क्रीडा आणि खेळांचा प्रचार-प्रसार करणे, नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करणे, युवक-युवतींमध्ये क्रीडा संस्कृती रुजविणे तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे, या उद्देशाने विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गडचिरोलीत संडे ऑन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश देण्यात आला.
चिमुकला अश्वित ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू -
रॅलीमध्ये नर्सरीत शिकणारा चिमुकला सायकलप्रेमी अश्वित प्रवीण रक्षमवार यानेही उत्साहाने सहभाग घेतला. त्याने इंदिरा गांधी चौक ते बसस्थानक या अंतरापर्यंत सायकल चालवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या चिमुकल्या सायकलस्वाराचा उत्साह रॅलीतील विशेष आकर्षण ठरला.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग -
रॅलीमध्ये वसंत विद्यालय, राणी दुर्गावती कन्या विद्यालय, विद्याभारती विद्यालय, शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय आणि स्वामी विवेकानंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाले. सायकल स्नेही मंडळाचे मुरलीधर दोनाडकर, विजय साळवे, वरुण धोडरे, उल्हास आखाडे, गिरीष कांबळे, कुणाल पेंदोरकर, सुभाष धंदरे, गुरुदेव रोहनकर, शरद गिऱ्हिपुंजे यांच्यासह मंडळाचे अनेक सदस्य रॅलीत सहभागी झाले. जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.
उत्साहात पार पडली रॅली -
इंदिरा गांधी चौक–बसस्थानक–क्रीडा प्रबोधिनी, पोटेगाव रोड या मार्गावरून सायकल रॅली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. रॅलीदरम्यान सहभागी सायकलस्वारांनी आरोग्य, व्यायाम आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ऋषिकांत पापडकर यांनी केले. मोठ्या संख्येने झालेल्या सहभागामुळे संडे ऑन सायकल’ उपक्रमाला गडचिरोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळा




Petrol Price




