बल्लारपुरात शेकडो नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी : रोग निदान व उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नगर परिषद बल्लारपूरच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत महिला व बालकल्याण समिती आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे), वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी गांधी विद्यालय, बल्लारपूर येथे भव्य मोफत रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो नागरिकांची नोंदणी करून विविध आजारांची तपासणी व उपचार करण्यात आले.
सावंगी (मेघे) रुग्णालयाचे संचालक डॉ. अभिषेक जोशी आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रिया गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बल्लारपूरचे आरोग्य अधिकारी डॉ. डांगे तसेच ग्रामीण रुग्णालय बल्लारपूरच्या आरोग्य पथकानेही शिबिरात आरोग्यसेवा दिली. सावंगी रुग्णालयातील विविध विभागांचे तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले.
शिबिरात नेत्ररोग, अस्थिरोग, मेडिसिन, शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, श्वसनरोग, कान-नाक-घसा तसेच मुखरोग अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी केली. रक्तदाब, रक्तातील साखर, हृदयरोग, किडनीचे आजार, अशक्तपणा, चक्कर येणे, छातीत दुखणे, धाप लागणे यांसह हाडांचे विकार, संधिवात, मोतिबिंदू, त्वचारोग, दमा, दीर्घकाळचा खोकला, कान-घशाचे विकार, दातांचे आजार आदींची तपासणी करण्यात आली.
महिलांसाठी मासिक पाळीशी संबंधित समस्या, गर्भाशयावरील गाठी, गर्भाशयाचे आजार आदींची तपासणी करण्यात आली. बालरोग विभागामार्फत कुपोषणासह लहान मुलांच्या विविध आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच हर्निया, हायड्रोसिल, अंगावरील गाठी, मुतखडा, पोटाचे आजार आदी समस्यांवरही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व उपचार करण्यात आले.
या आरोग्य शिबिराचा लाभ बल्लारपूर शहरातील नागरिकांसह बचत गटातील महिला, सफाई कर्मचारी आणि इतर नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. नागरिकांना त्यांच्या परिसरातच विविध तज्ज्ञांकडून मोफत आरोग्य तपासणी व उपचार मिळाल्याने शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नगराध्यक्षा डॉ. अलका अनिल वाढई, मुख्याधिकारी विशाल वाघ, उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड. मेघा भाले, उपसभापती शिल्पा चुटे तसेच नगर परिषद प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले. नगर परिषद प्रशासन, आरोग्य विभाग आणि सावंगी (मेघे) रुग्णालयाच्या संयुक्त प्रयत्नातून नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेले हे आरोग्य शिबिर यशस्वी ठरले.




Petrol Price




