कोरोना लशीमुळे पक्षाघाताचा धोका? : संशोधनातून माहिती आली समोर


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
एकीकडे जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला, तर जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांना कोरोना लशीवर अद्याप विश्वास नाही. कोरोना लशीच्या परिणामामुळे अनेकजण अजूनही लस घेण्यास कचरत आहेत. अशातच कोरोना लशीमुळे पक्षाघाताचा धोका असल्याची धक्कादायक माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा लस लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पण यातही सकारात्मक बातमी म्हणजे, कोरोना लशीच्या तोट्यांपेक्षा त्याचे फायदे अधिक असल्याचेही संबंधित संशोधनात म्हटले आहे.
द लॅन्सेट इनफेक्षियस डिसीजेस जर्नल या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, चीनने तयार केलेल्या कोरोनाव्हॅक या लशीचे फायदे तोट्यांपेक्षा अधिक आहेत, पण काही रुग्णांत चेहऱ्याचा पक्षाघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पण एक लाख रुग्णांमागे 4.8 लोकांना या चेहऱ्याच्या पक्षाघाताचा धोका असल्याचे हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे.
खरंतर, कोरोनाव्हॅक ही निष्क्रिय विषाणूपासून तयार केलेली लस आहे. याचाच परिणाम म्हणून लस लाभार्थ्याच्या चेहऱ्याच्या एका भागाला बेल्स पाल्सी या दुर्मिळ चेहऱ्याच्या पक्षाघाताचा धोका आहे. पण या आजाराची लक्षणे सहा महिन्यांच्या आत नष्ट होतात. त्यासाठी कोणताही उपचार करावा लागत नाही, असेही या संशोधनात सांगण्यात आले आहे. चीनच्या कोरोनाव्हॅक आणि फायझर या दोन लशींच्या दुष्परिणांमाबाबत हाँगकाँग विद्यापीठात अभ्यास करण्यात आला असून त्यात लशीचा डोस घेतल्यानंतर पहिल्या 42 दिवसांत बेल्स पाल्सीची लक्षणे किती जणात दिसली याची याबाबत संशोधन करण्यात आले आहे.
संबंधित अभ्यासानुसार, कोरोनाव्हॅक लस घेतलेल्या 4 लाख 51 हजार 939 लाभार्थ्यांमध्ये केवळ 28 जणांमध्ये बेल्स पाल्सी या दुर्मिळ आजाराची लक्षणे दिसली आहेत. तर फायझर कंपनीची BNT162B2 ही लस घेतलेल्या 5 लाख 37 हजार 205 जणांमध्ये 16 जणांना बेल्स पाल्सी या चेहऱ्याच्या पक्षाघाताची लक्षणे आढळली आहेत. फायझर बायोएनटेक आणि मॉडर्ना लशीमध्ये अशाप्रकारची लक्षणे दिसली नसल्याचा दावा, अमेरिकेच्या औषध प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पण युरोपीय वैद्यकीय संस्थेने मात्र संबंधित दोन लशींमध्येही अशाप्रकारची लक्षणं दिसून आल्याचे म्हटले होते. 
  Print


News - World | Posted : 2021-08-18Related Photos