नशामुक्तीचा संदेश, मेडिटेशनचा सराव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्यासोबतच मानसिक आरोग्य, एकाग्रता आणि सकारात्मक विचारांना चालना देण्यासाठी गोंगाव येथील सिंधु पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात ३ सप्टेंबर रोजी व्यसनमुक्ती मार्गदर्शन व मेडिटेशन सराव कार्यक्रम उत्साहात पार पडला. नशामुक्त भारत अभियान आणि मिशन स्पंदन अंतर्गत तसेच विकसित भारत की ओर एक सशक्त कदम या उपक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी मार्गदर्शन करताना सोनटक्के यांनी व्यसनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम तसेच त्याचा मानसिक आरोग्य आणि सामाजिक जीवनावर होणारा परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. व्यसनाची सुरुवात अनेकदा सहजपणे होत असली तरी त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवून आपल्या आरोग्याची आणि भविष्यातील आयुष्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
व्यसनांपासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मक सवयी अंगीकारणे, नियमित व्यायाम करणे, अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. निरोगी शरीर आणि निरोगी मन हे उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असल्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. यानंतर देवांग यांनी विद्यार्थ्यांना ध्यानधारणेचे महत्त्व पटवून दिले. नियमित मेडिटेशन केल्यामुळे मन शांत राहण्यास, एकाग्रता वाढण्यास तसेच सकारात्मक विचार करण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
मार्गदर्शनानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून सुमारे १० मिनिटांचा मेडिटेशनचा प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी शांत वातावरणात ध्यानधारणेचा अनुभव घेतला. व्यसनमुक्त जीवनशैलीसोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या मने होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना यांनी केले, तर फटिंग यांनी आभार मानले. शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




Petrol Price




