कळमना शाळेत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक बंडू मोरे होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख किरण कामडी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी कोवे उपस्थित होत्या. मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनी कार्यक्रमात सहभागी होत आपल्या जीवनातील विविध अनुभव आणि आठवणी विद्यार्थ्यांसमोर मनोगतातून व्यक्त केल्या.
यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांनी गाणी सादर केली. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमात आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव, संस्कार आणि मार्गदर्शन हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले. आजी-आजोबांचा सन्मान होत असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.
ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर, कृतज्ञता आणि आपुलकीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, तसेच ज्येष्ठांच्या अनुभवांचा नव्या पिढीला लाभ मिळावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागामुळे हा दिवस आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक धनंजय कहुरके, सुनील पोटे, जितेंद्र भारती आणि शिक्षिका लीना गुरनुले यांनी सहकार्य केले. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने ज्येष्ठ नागरिक दिनाचा कार्यक्रम आनंदात पार पडला.




Petrol Price




