अवैध सागवान लाकडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त : तिघांविरुद्ध वनगुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मध्य चांदा वनविभागांतर्गत विरूर वनपरिक्षेत्रातील देवाडा उपक्षेत्रात वनाधिकाऱ्यांनी गस्ती दरम्यान अवैध सागवान लाकडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. या कारवाईत सुमारे ९३ हजार रुपये किमतीचे सागवान लाकूड आणि अंदाजे २ लाख २५ हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण ३ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३ नोव्हेंबर २०२६ रोजी वनाधिकारी गस्तीवर असताना त्यांना एक संशयास्पद ट्रॅक्टर आढळून आला. ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये सागवान लाकूड आढळले. या लाकडाच्या वाहतुकीसंदर्भात आवश्यक शासकीय कागदपत्रे व परवाना मागितला असता बळीराम शंकर मल्लेलवार आणि कुंदन एकनाथ मडावी यांना कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे वनविभागाने ट्रॅक्टर-ट्रॉलीसह सागवान लाकूड जप्त केले.
चौकशीदरम्यान संबंधित दोघांनी हे सागवान लाकूड जिवती तालुक्यातील पुनागुडा येथील रहिवासी उद्धव नामदेव उबाडे यांच्या शेतात लपवून ठेवलेले असताना खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार बळीराम शंकर मल्लेलवार, कुंदन एकनाथ मडावी आणि उद्धव नामदेव उबाडे या तिघांविरुद्ध वनअपराध क्रमांक ०८९०१/२२२५०२ अन्वये ४ नोव्हेंबर रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आरोपींनी भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम २६(१)(एफ), ५२(१), ४१ व ४२(१) चे उल्लंघन केल्याचे वनविभागाने नमूद केले आहे.
ही कारवाई मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक योगेश वाघाये आणि राजुरा उपविभागीय वनाधिकारी मंगेश डी. गिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विरूर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश बी. दिघे व वनकर्मचाऱ्यांनी केली.




Petrol Price




