महत्वाच्या बातम्या

 गुरुदेव क्रांतीज्योत यात्रेचे वरोरा नगरीत भव्य स्वागत


- अहेतेशाम अली मित्र परिवारातर्फे आयोजन; राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पालखीचे पूजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  

तालुका प्रतिनिधी / वरोरा : श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथून ९ ऑगस्ट रोजी प्रस्थान केलेल्या गुरुदेव क्रांतीज्योत यात्रेचे वरोरा नगरीत अहेतेशाम अली मित्र परिवारातर्फे उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. आलिशान लॉन येथे आयोजित या स्वागत सोहळ्याला गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवाभावी उपासक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांतीज्योत यात्रेचे वरोरा येथे आगमन झाल्यानंतर उपस्थित मान्यवर व गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी क्रांतीज्योतीचे पूजन केले. त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखीचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित गुरुदेव सेवा उपासकांनी श्रद्धेने पूजन करून राष्ट्रसंतांच्या विचारांना अभिवादन केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामविकास, स्वच्छता, व्यसनमुक्ती, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश समाजाला दिला. त्यांच्या विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने क्रांतीज्योत यात्रा विविध ठिकाणी पोहोचत असून, यात्रेच्या स्वागतासाठी वरोरा शहरातही उत्साहाचे वातावरण होते. यात्रेच्या निमित्ताने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रांतीज्योतीचे दर्शन घेतले. या स्वागत कार्यक्रमाला माजी सर्वाधिकारी लक्ष्मणरावजी गमे, माजी नगराध्यक्ष तथा गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य अहेतेशाम अली, चंद्रपूर जिल्हा प्रचार प्रमुख रूपलालजी कावळे, वरोरा तालुका सेवाधिकारी वसंतराव निखाडे, वरोरा तालुका प्रचार प्रमुख संतोषराव जीवतोड,  चंद्रकलाताई मत्ते, नरेंद्रजी मते यांच्यासह वरोरा तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

याशिवाय तालुक्यातील पुरुष व महिला गुरुदेव सेवा उपासकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नागरिकांनीही यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करत क्रांतीज्योतीचे दर्शन घेतले. या सोहळ्यामुळे वरोरा नगरीत धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अहेतेशाम अली मित्र परिवारातर्फे करण्यात आलेल्या या भव्य स्वागतामुळे गुरुदेव भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आणि सामाजिक कार्याचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले.





  Print






Related Photos