पुनर्वसित गावठाणातील १६ सुशिक्षित बेरोजगारांची सेवायोजन नोंदणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : सेवा संकल्प अभियानांतर्गत पवनी तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष सेवायोजन नोंदणी व मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या वतीने महालगाव पुनर्वसन गावठाण (आमगाव) आणि परसोडी पुनर्वसन गावठाण (कोटलपार) येथील ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमात १८ ते ४५ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना महास्वयंम पोर्टलवरील निःशुल्क सेवायोजन नोंदणी (Employment Card) याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी, उपलब्ध शासकीय योजना आणि त्यासाठी आवश्यक प्रक्रिया याबाबत उपस्थित उमेदवारांना माहिती देण्यात आली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, भंडाराचे जिल्हा समन्वयक सुहास बोन्द्रे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जिल्हा समन्वयक अतुल पडोळे व नाजमा पठाण यांनी दोन्ही ग्रामपंचायतींना भेट देऊन प्रत्यक्ष नोंदणीची कार्यवाही पूर्ण केली.
महालगाव पुनर्वसन गावठाण (आमगाव) ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी साक्षी वाघमारे तसेच परसोडी पुनर्वसन गावठाण (कोटलपार) ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी मनोज रामटेके यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले. या उपक्रमात दोन्ही गावांतील एकूण १९ सुशिक्षित नोकरीइच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी १६ पात्र उमेदवारांची महास्वयंम पोर्टलवर सेवायोजन नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
पुनर्वसित गावठाणांतील युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांचा लाभ होणार असून, उर्वरित पात्र युवक-युवतींनीही महास्वयंम पोर्टलवर आपली सेवायोजन नोंदणी करून उपलब्ध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.




Petrol Price




