महत्वाच्या बातम्या

 प्लास्टिकच्या विळख्यातून चंद्रपूरला वाचविण्यासाठी मनपाची धडक कारवाई : ५० किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहराच्या स्वच्छ आणि निरोगी भविष्यासाठी सिंगल यूज प्लास्टिकविरोधात चंद्रपूर शहर महानगरपालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणासह मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असताना मनपाच्या स्वच्छता विभागाने भानपेठ प्रभागात कारवाई करून तब्बल ५० किलो प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिक आणि दोन बॉक्स डिस्पोजल ग्लास जप्त केले. या कारवाईमुळे प्लास्टिकमुक्त शहराच्या दिशेने मनपाने आणखी एक पाऊल टाकले आहे.

झोन क्रमांक २ (अ) अंतर्गत भानपेठ प्रभागातील यशपाल परमार राजपूत ट्रेडर्स येथे मनपाच्या पथकाने तपासणी केली. यावेळी बंदी असलेले सिंगल यूज प्लास्टिक आणि डिस्पोजल ग्लास मोठ्या प्रमाणात आढळून आले. पर्यावरणासाठी घातक ठरणारे हे साहित्य मनपाच्या पथकाने तात्काळ जप्त केले.

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांकडून ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. जप्त केलेल्या साहित्याचा साठा ताब्यात घेत मनपाने प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला आहे.

प्लास्टिकचा कचरा नाल्यांमध्ये, रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी साचल्याने शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. त्याचबरोबर पर्यावरणावर होणारा परिणाम भविष्यात अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ प्रशासनाची कारवाई पुरेशी नसून प्रत्येक नागरिकाने प्लास्टिकचा वापर टाळणे ही काळाची गरज आहे.

चंद्रपूरला स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त शहर बनविण्यासाठी नागरिक व व्यावसायिकांनी प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, विक्री आणि साठवणूक करू नये, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुरू असलेली ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.





  Print






Related Photos