लोकमान्य महाविद्यालयात लिप्पन आर्ट व कृत्रिम फुले निर्मिती कार्यशाळा

- विद्यार्थ्यांना कलाकौशल्यासोबत स्वयंरोजगाराच्या संधींचे मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : विद्यार्थ्यांच्या कलात्मक कौशल्याला चालना देत त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लोकमान्य महाविद्यालय, वरोरा येथील गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतीने लिप्पन आर्ट व कृत्रिम फुले तयार करणे या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद मिळाला.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. शास्त्री मॅडम होत्या. तर प्रा. वैष्णवी शास्त्री मॅडम यांनी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना लिप्पन आर्ट तसेच कृत्रिम फुले तयार करण्याच्या विविध पद्धतींची माहिती दिली. त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून लिप्पन आर्ट निर्मितीची प्रक्रिया, आवश्यक साहित्य, कलाकुसरीतील बारकावे तसेच कृत्रिम फुले तयार करण्याच्या विविध तंत्रांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
लिप्पन आर्ट ही पारंपरिक कलाकुसर आधुनिक सजावटीच्या माध्यमातून नव्या स्वरूपात लोकप्रिय होत असून, या कलेला व्यावसायिक दृष्टिकोनातूनही मोठी संधी असल्याचे कार्यशाळेतून अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकामध्ये सक्रिय सहभाग घेत विविध कलाकृती तयार करण्याचा अनुभव घेतला. त्यामुळे केवळ सैद्धांतिक माहिती न मिळता प्रत्यक्ष कृतीतून नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. प्रा. शास्त्री मॅडम यांनी लिप्पन आर्ट आणि कृत्रिम फुलांच्या निर्मितीमधून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना योग्य प्रशिक्षणाची जोड देऊन त्याचा उपयोग भविष्यात आर्थिक स्वावलंबनासाठी करावा, असेही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी लिप्पन आर्ट व कृत्रिम फुले निर्मितीबाबत उत्सुकतेने माहिती घेतली. विविध कलाकृती तयार करताना विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. कौशल्यविकास, सर्जनशीलता आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणाच्या दृष्टीने ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी मडावी यांनी केले, तर साक्षी येटे यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. योगिता गोरे व प्रा. जयश्री जाधव यांनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना व्यावसायिक कौशल्याची जोड देण्याची संधी देणारी ही कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.




Petrol Price




