सिरोली महागाव परिसरातील शेतात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला


- निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अनिल पवार; परिसरात खळबळ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरोली महागाव परिसरातील शेतात एका ३० वर्षीय युवकाचा मृतदेह निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना शनिवारी १७ दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अनिल करणसिंह पवार (वय ३०) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळपासून होता घरून बेपत्ता -
प्राथमिक माहितीनुसार, अनिल पवार हे शनिवारी सकाळी १० वाजतापासून घरातून बेपत्ता होते. बराच वेळ होऊनही ते घरी परतले नसल्याने त्यांचा मोठा भाऊ सुनील पवार यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना ते शेताच्या दिशेने गेले.
शेताजवळ आढळली गाडी -
शेताजवळ पोहोचल्यावर सुनील पवार यांना अनिल यांची गाडी आढळून आली. त्यामुळे त्यांनी परिसरातील शेतात शोध घेतला. यावेळी अनिल पवार यांचा मृतदेह निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. अनिल पवार यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, या घटनेबाबत अधिक तपशील मिळणे बाकी आहे.




Petrol Price




