आयटीआय आरमोरी येथे पाचवा कौशल्य दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न


- प्राविण्यप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव; कौशल्याधारित शिक्षणातून स्वावलंबी होण्याचे मान्यवरांचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : क्रांतीवीर राजा वेंकटप्पा नायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), आरमोरी येथे पाचवा कौशल्य दीक्षांत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमात संस्थेतून प्रशिक्षण पूर्ण करून प्राविण्य मिळविलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्याला प्रशिक्षणार्थी, पालक आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे गटनिदेशक रवी गोतमारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रविण राहटे उपस्थित होते. यावेळी पी. एम. होकम, बावणे मॅडम आणि सोनुने सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत बांडे यांनी केले, तर शैलेश गजभिये यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी प्राविण्यप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी आजच्या काळात कौशल्याधारित शिक्षणाचे वाढते महत्त्व, औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगाराच्या विविध पर्यायांवर प्रकाश टाकला. केवळ नोकरीच्या संधींच्या प्रतीक्षेत न राहता, आत्मविश्वास आणि तांत्रिक कौशल्याच्या बळावर स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात गटनिदेशक रवी गोतमारे म्हणाले की, आयटीआय आरमोरी ही केवळ प्रशिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या हाताला काम आणि त्यांच्या भविष्याला योग्य दिशा देणारी संस्था आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या ट्रेडमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात तसेच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून करिअर घडविण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी संस्थेत मिळविलेल्या तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि आपल्या कुटुंबासह संस्थेचे नाव उज्ज्वल करावे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी संस्थेच्या वतीने नेहमीच आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
प्रमुख पाहुणे पत्रकार प्रविण राहटे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आयटीआयचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, आरमोरीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आयटीआय ही खऱ्या अर्थाने वरदान ठरणारी संस्था आहे. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतःच्या कौशल्याच्या बळावर स्वयंरोजगार निर्माण करण्यावर भर द्यावा. गावातच वीजतंत्री, दुरुस्ती आणि विविध तांत्रिक सेवा व्यवसाय सुरू करून चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी आहे. आज सन्मानित झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशातून आरमोरीचे नाव उज्ज्वल केले असून, इतर विद्यार्थ्यांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्राविण्यप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव -
या समारंभात वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) ट्रेडमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कलश ढवगाये, द्वितीय क्रमांकाच्या आचल सावसाकडे आणि तृतीय क्रमांकाच्या निशा राऊत यांच्यासह रोहित थेरकर, तनुजा रणदिवे, मिताली मेश्राम, पियुष प्रधान, अमित राऊत, भूषण ढोंगडे, प्रियंका शेंडे, नम्रता गावतुरे, छकुली बागडे, भारत बारसागडे, प्रविण पाटणकर आणि सुरज गावतुरे या प्रशिक्षणार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या सन्मानामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कौशल्याधारित शिक्षणातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासोबतच ग्रामीण भागातील युवकांना स्वावलंबी बनविण्याचा संदेश या कौशल्य दीक्षांत समारंभातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेतील अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.




Petrol Price




