महत्वाच्या बातम्या

 वेकोलि बाधित गावांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा : शुद्ध पाणी, रोजगार व दुष्काळग्रस्तांना मदतीचा मुद्दा ऐरणीवर


- वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक संजय मिश्रा यांच्याशी रघुवीर हं. अहीर यांची विविध जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : वेकोलि बाधित गावांतील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासह त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि गावांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने दि. ०२/११/२०२६ रोजी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष  रघुवीर हंसराज अहीर यांनी वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक संजय मिश्रा यांची भेट घेऊन विविध जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत बाधित गावांमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी आणि दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदत मिळण्याच्या विषयांवर विशेष भर देण्यात आला. यावेळी घुग्गुस चे नगरसेवक गणेश पिंपळकर, मयूर भोकरे, विशाल डामेर, रमण तांड्रा, शाम खेवले, गणेश मुसळे, सिन्हा महाकाले, धनंजय सिंग, शैलेश दिंडेवार, चेतन शर्मा हे उपस्थित होते.

वेकोलि बाधित गावांमधील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीच्या CSR (कॉर्पोरेट सामाजिक दायित्व) निधीतून आर.ओ. वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारण्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित करण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न असून, यासाठी वेकोलि प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

जवळपास संपूर्ण चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर वेकोलि बाधित गावांतील गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा पुरवठा करून दिलासा देण्याचा विषयही चर्चेत आला. दुष्काळामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, अशा परिस्थितीत वेकोलि प्रशासनाने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून गरजू नागरिकांना मदत करावी, अशी मागणी करण्यात आली.

वेकोलिच्या ओव्हरबर्डन (OB) कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा बैठकीत ठळकपणे मांडण्यात आला. स्थानिक भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर होत असताना त्या भागातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगार मिळण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

या सर्व विषयांवर क्षेत्रीय महाप्रबंधक  संजय मिश्रा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बाधित गावांतील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली. वेकोलि बाधित गावांतील नागरिकांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करणे आणि गावांचा सर्वांगीण विकास साधणे यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न सुरू राहणार असल्याचे रघुवीर हंसराज अहीर यांनी यावेळी सांगितले.





  Print






Related Photos