बोली भाषेतील शब्दांनी प्रमाण मराठी अधिक समृद्ध झाली ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद अणेराव


- अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : बोली भाषा ही प्रमाण मराठीचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग असून, बोलीभाषेतून आलेल्या असंख्य शब्दांनी प्रमाण मराठी भाषा अधिक समृद्ध केली आहे. कोणतीही भाषा काळाच्या ओघात टिकून राहण्यासाठी तिच्यात नवनवीन शब्दांची भर पडणे आणि इतर भाषांमधून आलेले शब्द स्वीकारण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे. अशी भाषा काळाच्या कसोटीवर टिकून राहते, असे प्रतिपादन मराठी कवी तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद अणेराव यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाखनी येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश खोब्रागडे होते, तर जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
भाषा, संस्कृती आणि परंपरा परस्परपूरक -
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमोद अणेराव म्हणाले की, माणसाने काळाच्या ओघात अन्नसंस्कृतीसोबतच शब्दसंस्कृतीदेखील निर्माण केली असून ती जपली आहे. भाषा, संस्कृती आणि परंपरा या एकमेकींच्या हातात हात घालून पुढे जात असतात. त्यामुळे भाषेचे संवर्धन हे केवळ शब्दांचे जतन नसून, त्या भाषेशी जोडलेल्या संस्कृतीचे आणि परंपरांचेही जतन आहे.
जी भाषा दैनंदिन व्यवहारातून हद्दपार होते, ती भाषा काळाच्या कसोटीवर टिकून राहू शकत नाही. सध्याच्या काळात मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेचे प्राबल्य वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुढील पिढीने केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता अधिकाधिक वाचन करावे. त्याचबरोबर आपल्या बोली भाषेचे जतन, संवर्धन आणि दैनंदिन व्यवहारातील वापर वाढवून ती अधिक समृद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले.
झाडीबोलीचे जतन आवश्यक -
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी भंडारा-गोंदिया परिसरातील झाडीबोली ही समृद्ध बोलीभाषा असल्याचे सांगितले. बोलीभाषा जिवंत ठेवायची असेल तर तिचा दैनंदिन व्यवहारात सातत्याने वापर झाला पाहिजे. ती नियमितपणे बोलली गेली पाहिजे. बदलत्या सांस्कृतिक प्रवाहामुळे मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये, यासाठी भाषेचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. एखादी भाषा किंवा बोली बोलणारा समुदाय जिवंत राहिला आणि त्याचे सामाजिक-सांस्कृतिक अस्तित्व टिकून राहिले, तरच ती भाषा पुढील पिढीकडे प्रवाहित होत राहते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मानवी सर्जनशीलता जपण्याचे आवाहन -
आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यातून होणाऱ्या रेडिमेड सर्जनशील प्रक्रियेमुळे मानवी सर्जनशीलता कमी होऊ नये, यासाठी शब्दांच्या पाठीमागील भाव, संवेदना आणि मानवी अनुभव जिवंत ठेवणे आवश्यक आहे, असे डॉ. खोब्रागडे यांनी सांगितले. मातृभाषेचा विकास करण्यासाठी अधिकाधिक वाचन, चिंतन आणि मनन केले पाहिजे. मराठी भाषेचा सन्मान, जतन आणि संवर्धन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
शासकीय कामकाजात मराठीच्या प्रभावी वापरावर भर -
जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांनी मराठी भाषा संवर्धनाच्या अनुषंगाने विविध शासकीय विभागांकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शासकीय कामकाजात मराठी भाषेचा प्रभावी वापर करण्याबरोबरच भाषा संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या विविध प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी खोम्नेद्र बोपचे यांनी केले. लिपिक राजेश शरणागते यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, वाचक आणि भाषा संवर्धनाशी संबंधित मान्यवरांची उपस्थिती होती.




Petrol Price




