कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी : सिंदेवाही पोलिसांची कारवाई, १.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध सिंदेवाही पोलिसांनी कारवाई केली. २५ ऑक्टोबर रोजी मौजा लोनवाही येथील ईदगाहजवळ सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या या जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत रोशन नंदू करकाडे २३ वर्ष , रा. गुरुदेव चौक, सिंदेवाही याला पकडण्यात आले.
तर पोलिसांची चाहूल लागताच ५ आरोपी फरार झाले. घटनास्थळावरून दोन कोंबडे, ४०० रुपये रोख आणि पाच मोटारसायकली असा एकूण १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रोशन करकाडे याच्यासह पाच मोटारसायकलींच्या चालकांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करण्यात आली.
सिंदेवाही पोलीस ठाण्याचे पोलीस पथक जुगारविरोधी कारवाई व गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, लोनवाही येथील ईदगाहजवळ काही जण कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणारे इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून रोशन नंदू करकाडे याला पकडले.
घटनास्थळाची पाहणी केली असता दोन लाल रंगाचे कोंबडे, ४०० रुपये रोख आणि हिरो स्प्लेंडर प्लसच्या तीन, हिरो ग्लॅमरची एक व हिरो पॅशन एक्स प्रोची एक अशा पाच मोटारसायकली आढळून आल्या. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार लता वाढीवे यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम, पोहवा संजय जुमानके, पोअं नंदकिशोर, आफताब आणि शुभम यांनी केले.




Petrol Price




