शहराच्या विस्तारासाठी जागा अपुरी : पेपर मिलची १९.४३ हेक्टर जमीन नगर परिषदेला देण्याची मागणी


- जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना शिष्टमंडळाचे निवेदन; सार्वजनिक सुविधांसाठी जमिनीचा वापर करण्याचा प्रस्ताव
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील नागरी गरजा लक्षात घेता बल्लारपूर शहराच्या विकासासाठी उपलब्ध असलेली जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे बल्लारपूर पेपर मिलची शासनजमा झालेली १९.४३ हेक्टर जमीन नगर परिषदेकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बल्लारपूर चे नगराध्यक्षा अल्का अनिल वाढई यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्षा छाया मडावी आणि नगरसेवक भास्कर माकोडे यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट घेतली. यावेळी जमिनीच्या हस्तांतरणासंदर्भात निवेदन देण्यात आले.
बल्लारपूर शहराच्या एका बाजूला नदीचे क्षेत्र, तर दुसऱ्या बाजूला वनक्षेत्र आहे. तसेच काही भाग ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्याने शहराचा विस्तार करण्यावर भौगोलिक आणि प्रशासकीय मर्यादा निर्माण झाल्या आहेत. भविष्यात लोकसंख्या वाढल्यास निवास, रस्ते, वाहतूक, उद्याने, बाजारपेठ, सार्वजनिक कार्यालये आणि इतर नागरी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर जागेची गरज भासणार आहे. पेपर मिलची शासनजमा असलेली १९.४३ हेक्टर जमीन नगर परिषदेकडे आल्यास तिचा उपयोग शहराच्या सार्वजनिक विकासासाठी करता येईल. प्रधानमंत्री आवास योजना, श्रम साफल्य योजना, वाहनतळ, बाजारपेठ, उद्याने, सामाजिक व सांस्कृतिक सुविधा, प्रशासकीय इमारती तसेच विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी ही जमीन उपयोगात आणण्याचा प्रस्ताव शिष्टमंडळाने मांडला.
शहराच्या दीर्घकालीन विकासाचा विचार करून या जमिनीचा उपयोग नियोजनबद्ध पद्धतीने केल्यास भविष्यातील अनेक नागरी समस्यांवर तोडगा काढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे जमीन नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शहराच्या विकासासाठी उपलब्ध जागेचा प्रश्न गंभीर होत असताना शासनजमा जमीन नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याच्या मागणीमुळे या प्रस्तावाकडे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता बल्लारपूरकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान याच जमिनी करीता माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ESIC रुग्णालय उभारणी साठी मगिणी केली होती.




Petrol Price




