मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूतीचे सादरीकरण
- विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी केले सादरीकरण
- प्रकल्पाची कामे तातडीने आणि गतीने करण्याचे निर्देश
- प्रकल्पातून होणार राष्ट्रपित्यांचे विचार, आचरणाचे दर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा, सेवाग्राम व पवनारच्या विकासासाठी सेवाग्राम विकास आराखडा राबविण्यात येत आहे. यासोबतच राष्ट्रपित्यांच्या विचारांचे दर्शन घडविणारा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनूभूती’ हा नवीन उपक्रम राबविण्यास शासनाने मंजूरी दिली असून त्याचे सादरीकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष व त्यांच्या जिल्ह्यातील आगमनास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य शासनाने सेवाग्राम विकास आराखडा जाहीर केला होता. वर्धा, सेवाग्राम व पवनारच्या विकासासह गांधीजींच्या विचार व मुल्याचे दर्शन घडविणाऱ्या कामांचा आराखडयात समावेश आहे. आराखड्यातून १२५ कामे केली जात आहे. यापैकी बहुतांश कामे पुर्ण झाली आहे.
आराखड्याला जोडूनच गेल्यावर्षी शासनाने ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती’ हा उपक्रम मंजूर केला होता. ३९ कोटी ७५ लाख रुपयांच्या या आराखड्यातून केल्या जात असलेल्या कामांचे सादरीकरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या उपक्रमातून गांधीजींचे विचार व मुल्यांवर आधारीत केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती सादर केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती या उपक्रमाद्वारे ग्रंथालय आणि रिसोर्स सेंटर, गांधी विचार आणि प्रतिमा: हेरिटेज ट्रेलचा विस्तार, अभ्यागत केंद्राच्या ठिकाणी इंटरॲक्टीव्ह प्रदर्शन- ३ डी इमेजिंग, मल्टी मीडिया तंत्रज्ञानाचा वापर करून गांधीजींचे अर्थव्यवस्था, धर्म, जाती, लिंग यासंबंधीचे विचार तरूण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अभ्यागत केंद्राच्या मोकळ्या जागेवर प्रदर्शन लावले जाणार असून तेथे गांधीजींच्या जीवनातील स्वातंत्र्य चळवळ कालावधीतील महत्वपूर्ण घटनांवर आधारीत मल्टी मीडिया चित्र लावले जातील.
वर्धा रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या रेल्वे कोचच्या जवळ दक्षिण अफ्रिकेतील निवासाबाबत कलाकृती, प्रदर्शन आणि नवीन लँडस्केपचे निर्माण केले जाणार आहे. सेवाग्राम आश्रम परिसरातील हेरीटेज पोस्ट ऑफीसचा वारसा जतन करून तिथे तिकीट संग्रहालय प्रदर्शनीचे आयोजित करण्यात येईल. याशिवाय थिएटर, या परिसरातील तलाव, बागांच्या विकासाची कामेही घेतली जात आहे. या सर्व प्रस्तावित बाबींचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले.
News - Wardha