वन्यजीव निरीक्षण यंत्रणेला चोरट्यांचा धक्का : चितेगावच्या जंगलातून आठ ट्रॅप कॅमेरे चोरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासह प्राणी गणना व वन्यजीव संरक्षणासाठी जंगलात लावण्यात आलेले तब्बल आठ ट्रॅप कॅमेरे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची गंभीर घटना चितेगाव-राजोली वनक्षेत्रात उघडकीस आली आहे. या चोरीमुळे वन्यजीवांच्या हालचालींच्या निरीक्षण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चितेगाव येथील वनरक्षक सतीश आनंदराव नागोसे यांनी याबाबत मुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली यांच्या आदेशानुसार उपक्षेत्र राजोली अंतर्गत चितेगाव नियतक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच प्राणी गणना व संरक्षणाच्या दृष्टीने ११ मे २०२६ रोजी एकूण आठ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले होते. या कॅमेऱ्यांची दर १५ दिवसांनी पाहणी केली जात होती.
दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी सकाळी गस्तीवर असताना वनरक्षकांनी संबंधित कॅमेऱ्यांची पाहणी केली. त्यावेळी कॅमेरा ट्रॅप क्रमांक ७७-ए, ७७-बी, ७८-ए, ७८-बी, ८७-ए, ८७-बी, १७३-ए आणि १७३-बी हे आठही कॅमेरे त्यांच्या ठिकाणी आढळून आले नाहीत. प्रत्येक कॅमेऱ्याची अंदाजे किंमत पाच हजार रुपये असून, एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
१ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने जंगलात प्रवेश करून वन्यजीव निरीक्षणासाठी लावलेले हे कॅमेरे चोरून नेल्याचा संशय आहे. या घटनेमुळे वनक्षेत्रातील सुरक्षा आणि वन्यजीव निरीक्षण यंत्रणेबाबत चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणी मुल पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, चोरीचा तपास मुल पोलीस करीत आहेत.




Petrol Price




