महत्वाच्या बातम्या

 रत्नापूर येथे उमेद अभियानाचा बँक मेळावा उत्साहात संपन्न


- १५ स्वयंसहाय्यता बचत गटांना बँक कर्ज प्रमाणपत्रांचे वितरण; आर्थिक समावेशनावर भर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे मंगळवार १३ ऑक्टोबर २०२६ रोजी बँक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना बँकिंग सेवांशी जोडणे, कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमात १५ स्वयंसहाय्यता बचत गटांना बँक कर्ज प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या मेळाव्याला जिल्हा अभियान व्यवस्थापक  प्रवीण भांडारकर, जिल्हा व्यवस्थापक (आर्थिक समावेशन)  नरेंद्र नगराळे, बँक व्यवस्थापक. मोहुर्ले, बँक ऑफ इंडिया, नवरगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक पांडा,  रमाकांत लोधे , संजय गहाणे,  कल्पना देवाळकर,दिनेश जांभूळकर , स्नेहल मडावी, रंगारी आणि  वंदना मोहुर्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उमेद अभियानाचे अधिकारी व कर्मचारी आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमादरम्यान महिलांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), अटल पेन्शन योजना (APY) तसेच वैयक्तिक कर्ज सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बँकिंग व्यवहार, विमा संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि उपलब्ध आर्थिक योजनांचा लाभ कसा घ्यावा, याविषयीही माहिती देण्यात आली.

जनसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या कर्ज प्रकरणांना गती देणे, कर्ज प्रस्ताव तयार करणे आणि महिलांना बँकांच्या विविध आर्थिक सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बँक अधिकारी आणि उमेद अभियानाच्या प्रतिनिधींनी महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले.

या बँक मेळाव्यामुळे ग्रामीण महिलांना बँकिंग सेवांची माहिती मिळण्यास, कर्ज प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण होण्यास आणि आर्थिक समावेशनाला चालना मिळण्यास मदत झाली. उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला स्वयंसहाय्यता बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरला.





  Print






Related Photos