आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित घरांच्या नुकसानीपोटी ३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : सन २०२३ आणि २०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शहरी व ग्रामीण भागातील घरांच्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी सातत्याने शासनस्तरावर आवाज उठविणाऱ्या आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ तसेच ऑगस्ट-सप्टेंबर २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या घरांच्या पडझडीसह गोठ्यांच्या नुकसानीपोटी गोंदिया जिल्ह्यासाठी ३ कोटी ४३ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
गेल्या काही वर्षांत आमदार विनोद अग्रवाल यांनी बाधित भागांचा दौरा करून नागरिकांना झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी, हा मुद्दा शासनासमोर ठामपणे मांडला होता. नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शहरी व ग्रामीण कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यांना शासनाच्या नियमानुसार तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली होती. आता शासनस्तरावर गोंदिया जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने त्यांच्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण यश मिळाल्याचे मानले जात आहे.
शासनाचा निर्णय सीएलएस-२०२६/प्र.क्र. २९२/मदत-१, मंत्रालय, मुंबई, २९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला. या निर्णयाबद्दल आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील तसेच प्रशासनातील अपर मुख्य सचिव यांचे आभार मानले.
गोंदिया जिल्ह्यासाठी ३ कोटी ४३ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर होणे ही बाब अशा वेळी महत्त्वपूर्ण मानली जात आहे, जेव्हा अतिवृष्टीमुळे बाधित शहरी व ग्रामीण भागातील कुटुंबे नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत होती. आमदार विनोद अग्रवाल यांनी नागरिकांच्या नुकसानीचा आणि आर्थिक मदतीचा मुद्दा सातत्याने शासनासमोर मांडल्यानंतर सरकारकडून एवढ्या मोठ्या निधीला मंजुरी मिळणे, हा त्यांच्या राजकीय प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
विशेष म्हणजे, आमदार विनोद अग्रवाल यांनी सध्या गोंदिया जिल्ह्यातील सर्व तहसील दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी शासनदरबारी केली आहे. या मागणीची महाराष्ट्र शासनाने तत्काळ दखल घेत संबंधित विभागाला प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.




Petrol Price




