दिवाळीपूर्वी गोंदिया जिल्ह्यातील सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची आगाऊ मदत मिळण्यास सुरुवात!


- आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे आर्थिक सहाय्याची रक्कम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : हवामानातील बदल आणि पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळवून देण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी विधानसभेत आवाज उठविला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.
शेतकऱ्यांची ही समस्या गांभीर्याने घेत महाराष्ट्र शासनाने सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याच्या उद्देशाने ५ हजार रुपयांची आगाऊ मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ५ हजार रुपयांची आगाऊ मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील सुमारे ७० हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी पुढाकार घेतला आहे. दिवाळीपूर्वी सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा होईल, असे त्यांनी सांगितले.एकही शेतकरी या आगाऊ मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी आमदार अग्रवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यापर्यंत मदतीची रक्कम पोहोचविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
आमदार अग्रवाल यांनी सांगितले की, ५ हजार रुपयांची ही आगाऊ मदत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी देण्यात येत आहे. याशिवाय पिकांच्या प्रत्यक्ष नुकसानीच्या पंचनाम्यांवर आणि मूल्यांकनाच्या आधारे शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाईची रक्कमही शेतकऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहे.
शासनाकडून शेतकऱ्यांना यापूर्वी करण्यात आलेल्या मदतीबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.




Petrol Price




