महत्वाच्या बातम्या

 रेल्वेच्या कामांचा फटका बल्लारपूरकरांना : न.प. उपाध्यक्ष आर्य आक्रमक


- गोल पुलावरील वाहतूक, नाल्याच्या समस्येसह वस्ती भागात तिकीट काउंटरची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरात रेल्वे विभागाकडून तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू असले तरी या कामांमुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. रेल्वे विकासकामांचा वेग वाढवून प्रलंबित समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी बल्लारपूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी केली आहे. याबाबत त्यांनी १ सप्टेंबर रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे गोल पुलाजवळील सांडपाण्याचा नाला तुंबला असून आंबेडकर वॉर्ड आणि राणी लक्ष्मीबाई वॉर्डातील नागरिकांच्या घरांमध्ये सांडपाणी शिरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नाल्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, वस्ती भागाला शहराशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग गोल पुलाखालून जातो. मात्र, रेल्वेच्या बांधकामामुळे मागील दीड वर्षांपासून या मार्गावरील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पादचारी तसेच वाहनधारकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने गोल पुलाचे काम तातडीने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी आर्य यांनी केली.

वस्ती परिसरातील नागरिकांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेता या भागाच्या बाजूला स्वतंत्र रेल्वे तिकीट काउंटर सुरू करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.बल्लारपूर शहरातील रेल्वेसंबंधित सर्व समस्या योग्य पातळीवर मांडून रेल्वे प्रशासनाकडून त्यांचे तातडीने निराकरण करून घ्यावे, अशी विनंती देवेंद्र आर्य यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे केली आहे.





  Print






Related Photos