अवैध दारू वाहतुकीवर गडचिरोली पोलिसांची कारवाई : २.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त


- चारचाकी वाहनातून देशी-विदेशी दारूची वाहतूक करणारा आरोपी ताब्यात , दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही छुप्या पद्धतीने अवैध देशी-विदेशी दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. याच मोहिमेअंतर्गत कुरखेडा पोलिसांनी सापळा रचून चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत दारूसह वाहन असा एकूण २ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई २७ ऑगस्ट २०२६ रोजी कुरखेडा पोलिसांनी वडसा-कुरखेडा मार्गावर केली.
गोपनीय माहितीच्या आधारे सापळा -
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असताना अवैधरीत्या दारूची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार कुरखेडा पोलीस पथकाकडून अवैध दारूविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. २७ ऑगस्ट रोजी कुरखेडा पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच्या गस्तीवर असताना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. वडसा ते कुरखेडा मार्गावरून पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी वडसा-कुरखेडा मार्गावर तात्पुरता अडथळा उभारून वाहनांची तपासणी सुरू केली. काही वेळाने संशयित पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सौरभ संतोष डहाळे२५ वर्ष रा. चिखली, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली) असे सांगितले.
वाहनाची झडती घेताच दारूचा साठा उघड -
पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात संत्री कंपनीची देशी दारू — २० बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये १०० नग, असे एकूण २,००० नग; किंमत १ लाख २० हजार रुपये.
रॉयल स्टॅग कंपनीची विदेशी दारू — २ बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये ४८ नग, असे एकूण ९६ नग; किंमत ३८ हजार ४०० रुपये.
सह्याद्री गोल्ड कंपनीची विदेशी दारू — १ बॉक्स, एकूण ४८ नग; किंमत १९ हजार २०० रुपये.
मारुती सुझुकी रिट्झ चारचाकी वाहन (क्रमांक एमएच १२ एनबी २०८५) — अंदाजे किंमत १ लाख रुपये.
अशा प्रकारे दारू व वाहनासह एकूण २ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला.
दारूचा माल कोणाचा, चौकशीत नाव समोर -
जप्त करण्यात आलेल्या दारूच्या साठ्याबाबत पोलिसांनी सौरभ डहाळे याच्याकडे अधिक चौकशी केली. चौकशीदरम्यान सदर दारूचा मुद्देमाल मोहन लांजेवार ४२ वर्ष रा. केशोरी, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) याचा असल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्र. १९३/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (अ), ८३ अन्वये सौरभ संतोष डहाळे आणि मोहन लांजेवार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई -
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कुरखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कुणाल रेगूलवार, पोलीस हवालदार संतोष कांबळे, चालक पोलीस शिपाई अरुणा लोहंबरे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त व तपासणी अधिक प्रभावी करण्यात येत आहे.




Petrol Price




