महत्वाच्या बातम्या

 कापूस उत्पादक शेतकरी शासकीय नोंदणीपासून वंचित :  खुल्या बाजारात विक्रीची वेळ


- पोर्टलवर वेळेत नोंदणी न झाल्याने पोर्ला परिसरातील चार ते पाच गावांतील शेतकरी अडचणीत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : तालुक्यातील पोर्ला परिसरातील चार ते पाच गावांतील अनेक कापूस उत्पादक शेतकरी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी न झाल्यामुळे शासकीय खरेदी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासकीय केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक आहे. मात्र, वेळेत नोंदणीची सुविधा उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांसमोर कापूस विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यंदा कापूस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभावाचा लाभ मिळावा, यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, पोर्ला परिसरातील अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. परिणामी, शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विकण्याची संधी त्यांना मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विकता येत नसल्यास शेतकऱ्यांना नाइलाजाने खुल्या बाजारात खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागणार आहे. तेथे हमीभावापेक्षा कमी दर मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. आधीच शेतीचा वाढता खर्च आणि उत्पादनातील अनिश्चिततेमुळे शेतकरी अडचणीत असताना नोंदणीअभावी आणखी संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे पोर्ला परिसरातील नोंदणीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा ऑनलाइन नोंदणीची संधी उपलब्ध करून द्यावी, तसेच शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीची व्यवस्था करावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांकडून होत आहे.





  Print






Related Photos