महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीतील दुर्गम गावातून कर्टिन विद्यापीठापर्यंत : शिक्षण पूर्ण करून इग्नासियसची मायभूमीतच कारकिर्दीला सुरुवात


- लॉयड्स इनफिनिट फाउंडेशनच्या कर्टिन युनिव्हर्सिटी स्पॉन्सरशिप प्रोग्रामचा पहिला पदवीधर; लॉयड्स मेटल्समध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली ८ सप्टेंबर २०२६ : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाने ऑस्ट्रेलियातील नामांकित कर्टिन विद्यापीठापर्यंत मजल मारत उच्च शिक्षण पूर्ण केले आणि आता शिक्षणानंतर पुन्हा मायभूमीत परतून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली आहे. इग्नासियस प्रकाश बाडा असे या युवा यशस्वी विद्यार्थ्याचे नाव असून, ते लॉयड्स इनफिनिट फाउंडेशनच्या कर्टिन युनिव्हर्सिटी स्पॉन्सरशिप प्रोग्रामच्या पहिल्या बॅचमधील शिक्षण पूर्ण करणारे पहिले विद्यार्थी ठरले आहेत.

सुरजागड लोहखनिज खाणीच्या परिसरातील बांदे या दुर्गम गावात सात जणांच्या कुटुंबात वाढलेल्या इग्नासियस यांच्यासाठी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे हे एकेकाळी दूरचे स्वप्न होते. त्यांचे वडील प्रकाश बाडा हे शेतकरी असून आई सरिता या अंगणवाडी मदतनीस आहेत. अत्यंत साध्या कौटुंबिक आणि ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या इग्नासियस यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली.

ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील कर्टिन युनिव्हर्सिटीमधून ‘इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप’ विषयातील मास्टर डिग्री त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते गडचिरोलीत परतले असून, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

शिष्यवृत्तीमुळे परदेशातील शिक्षणाचे स्वप्न झाले साकार -

इग्नासियस यांच्या या यशामागे लॉयड्स इनफिनिट फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडची CSR शाखा असलेल्या लॉयड्स इनफिनिट फाउंडेशनने गडचिरोली आणि परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कर्टिन युनिव्हर्सिटी स्पॉन्सरशिप प्रोग्राम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण आणि दुर्गम भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, आंतरराष्ट्रीय अनुभव आणि व्यापक व्यावसायिक दृष्टिकोन मिळवून देणे हा आहे. या कार्यक्रमांतर्गत इग्नासियस यांच्या शिक्षण शुल्कासोबतच निवास, प्रवास आणि दैनंदिन जीवनावश्यक खर्चाचीही जबाबदारी फाउंडेशनने घेतली. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे परदेशातील शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता असताना इग्नासियस यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाची संधी मिळाली आणि त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले.

बांदे ते कर्टिन आणि पुन्हा गडचिरोलीचा प्रेरणादायी प्रवास -

आपल्या प्रवासाबद्दल भावना व्यक्त करताना इग्नासियस प्रकाश बाडा म्हणाले, “हे माझ्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. बांदे गावातून येताना ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्याची आणि पूर्णपणे वेगळ्या शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्याने माझा दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा बदलल्या. हा प्रवास शक्य करून दिल्याबद्दल आणि माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना अशा संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी श्री. बी. प्रभाकरन यांचा मनापासून आभारी आहे. आपल्या गावात परत येऊन येथेच माझ्या कारकिर्दीला सुरुवात करणे हा या प्रवासाचा माझ्यासाठी अत्यंत अर्थपूर्ण भाग आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्थानिक युवकांना जागतिक संधी देण्याच्या संकल्पाची पूर्तता -

इग्नासियस यांचे यश हे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बी. प्रभाकरन यांनी २०२३ मध्ये केलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक मानले जात आहे. स्थानिक युवकांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देतानाच त्यांनी शिक्षणानंतर आपल्या भागाच्या विकासात योगदान द्यावे, हा या उपक्रमामागील प्रमुख विचार आहे.

इग्नासियस यांच्या यशाबद्दल बोलताना बी. प्रभाकरन म्हणाले, हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. हा कार्यक्रम सुरू करताना आम्ही स्थानिक युवकांसाठी जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्याचे आणि त्यांनी परत येऊन गडचिरोलीच्या विकासात योगदान द्यावे, यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याचे वचन दिले होते. इग्नासियसने हे वचन प्रत्यक्षात साकार होऊ शकते, हे दाखवून दिले आहे. बांदेपासून कर्टिनपर्यंत आणि पुन्हा लॉयड्समध्ये परत येण्यापर्यंतचा त्याचा प्रवास या भागातील अनेक तरुणांना प्रेरणा देईल. ही तर केवळ सुरुवात आहे, असे प्रभाकरन यांनी नमूद केले.

गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसाठी नवी प्रेरणा -
दुर्गम गावातील शेतकरी आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या कुटुंबातून आलेल्या इग्नासियस यांनी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठात उच्च शिक्षण पूर्ण करून पुन्हा गडचिरोलीत परतत स्थानिक पातळीवर आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाची कहाणी न राहता, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही जागतिक स्तरावर संधी मिळू शकते आणि त्या संधीचा उपयोग आपल्या मातृभूमीच्या विकासासाठी करता येतो, याचे उदाहरण ठरला आहे. बांदे ते कर्टिन आणि पुन्हा गडचिरोली असा हा प्रवास लॉयड्स इनफिनिट फाउंडेशनच्या स्पॉन्सरशिप कार्यक्रमातून पूर्ण झालेला पहिला यशस्वी शैक्षणिक प्रवास आहे. इग्नासियस यांची ही यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासावर फाउंडेशनचा भर -
लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन ही लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडची CSR शाखा आहे. गडचिरोली आणि आसपासच्या समुदायांच्या विकासासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य विकास आणि शाश्वत विकासाशी संबंधित विविध उपक्रम राबविले जातात. स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा कर्टिन युनिव्हर्सिटी स्पॉन्सरशिप प्रोग्राम हा त्याच व्यापक सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.





  Print






Related Photos