मेक्सिकोमध्ये सुमारे २३ हजार वर्षांपूर्वींच्या आढळल्या मानवी पाऊलखुणा


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / दिल्ली :
हजारो वर्षांपूर्वी वातावरणातील बदलांमुळे मानव पृथ्वीवर एका ठिकाणाहून विविध ठिकाणी स्थलांतर करत होता. मानवाचे हे स्थलांतर नेमके कसे आणि कुठे झाले, याबाबत संशोधक अभ्यास करत आहेत. या अभ्यासाला आणि आतापर्यंतच्या मान्यतेला नवी कलाटणी देणारी घटना घडली आहे. मेक्सिकोमध्ये सुमारे 23 हजार वर्षांपूर्वींच्या मानवी पावलांचे ठसे आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतचे मानवाच्या अमेरिकेतील प्रवेशाबाबतचे अंदाज बदलण्याची शक्यता आहे. अमेरिका खंडात सुमारे 13 ते 16 हजार वर्षांपूर्वी मानवाचे स्थलांतर झाल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मात्र, मेक्सिकोमध्ये नुकत्याच सापडलेल्या पाऊलखुणांमुळे अमेरिकेत मानव 23 हजार वर्षांपूर्वीच आल्याचे दिसून येत आहे. मेक्सिकोत सापडलेल्या या पाऊलखुणा पुरातत्त्व संशोधकांचे मोठे यश आहे. त्यामुळे आतापर्यंत मान्यता असलेल्या काळाच्या 10 हजार वर्षांपूर्वीच मानव अमेरिकेत दाखल झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत Bournemouth University च्या संशोधकांनी माहिती दिली आहे.
ब्रिटन आणि अमेरिकेच्या पुरातत्व संशोधकांनी अलकाली फ्लॅट नावाच्या सुकलेल्या सुरोवरात काही पुराव्यांची आधारे अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना 23 हजार वर्षांपूर्वीच्या मानवी पाऊलखुणा सापडल्या आहेत. न्यू मॅक्सिकोतील व्हाईस सँडस् नॅशनल पार्कमध्ये चिखलात या पाऊलखुणा सापडल्या आहेत. रेडिओकार्बन तंत्रज्ञानाद्वारे याचा अभ्यास केल्यावर या पाऊलखुणा 23 हजार वर्षांपूर्वीच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याकाळात अमेरिकेतील बराचसा भाग बर्फाच्छादित होता आणि समुद्राचा जलस्तर 400 फूटांनी कमी होता. या पाऊलखुणांमुळे त्या वेळी या ठिकाणी मानवी वास्तव्य असल्याचा आणि त्या काळातील मानव शिकार करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
उत्तर अमेरिकेतील बर्फ वितळण्यास सुरुवात झाल्यावर सुमारे 13 ते 16 हजार वर्षांपूर्वी मानव अमेरिकेत आल्याचे मानण्यात येत होते. 16 हजार वर्षापूर्वी या भागात मानवाचे वास्तव्य असल्याचे पुरावे सापडले आहेत. तर 33 हजार वर्षांपूर्वीच्या जनावरांच्या हाडांचे अवशेष आणि जिवाश्म सापडले आहेत. तसेच लाकूड जळाल्याने तयार होणार कोळसाही सापडला आहे. मात्र, त्या काळात या ठिकाणी मानवाचे वास्तव्य असल्याचे कोणतेही पुरावे सापडले नव्हते. मात्र, आता या पाऊखुणांमुळे 23 हजार वर्षांपूर्वीच मानव अमेरिकेत आल्याचे दिसून येत आहे.
सुमारे 40 हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगात मानवी जीवन कसे असेल, याचा अभ्यास या पाऊलखुणांच्या आधारे करण्यास मदत होणार आहे. या पाऊलखुणांमध्ये तरुणांच्या आणि मुलांच्या पाऊलखुणा आहेत. आशिया खंडातून मानवाचे अमेरिकेत स्थलांतर झाल्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. भूमार्गे ते बेरिंग स्टेट पार करून अमेरिकेत आले होते. सध्या हा सर्व भाग पाण्याखाली गेला आहे. हिमयुगात ग्लेशिअर्समुळे हा मार्ग बंद होता. उत्तर अमेरिकेतील बर्फ वितळण्यास सुरुवात झाल्यावर 33 हजार वर्षांपूर्वी मानवाचे या भागात आगमन झाल्याचा तर्क आता या पाऊलखुणांच्या आधारे व्यक्त करण्यात येत आहे.  Print


News - World | Posted : 2021-09-25
Related Photos