अग्निशमन कर्मचाऱ्याकडून झाडांच्या फांद्यांची छाटणी : यंत्र डोक्यावर पडल्याने गंभीर दुखापत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांकडून अन्य कामे करून घेतली जात असल्याचा गंभीर प्रकार बल्लारपूर नगर परिषदेत समोर आला आहे. अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या हरीओम मडावी यांना झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी पाठविण्यात आले होते. यावेळी फांद्या कापण्याचे यंत्र अचानक हातातून घसरून थेट त्यांच्या डोक्यावर पडले. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला आठ टाके घालावे लागले. या घटनेमुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा तसेच त्यांच्या कामकाजाच्या नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, हरीओम मडावी हे आपल्या अन्य दोन सहकाऱ्यांसह अग्निशमन अधिकारी शुभम रत्नपारखी यांच्या तोंडी आदेशानुसार जाकिर हुसेन प्रभागात झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी गेले होते. छाटणीचे काम सुरू असताना फांद्या कापण्याचे यंत्र अचानक घसरून मडावी यांच्या डोक्यावर पडले. या अनपेक्षित दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांच्या डोक्याला आठ टाके घालण्यात आले.
या घटनेमुळे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांकडून नेमकी कोणती कामे करून घेतली जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात आग लागल्यास तातडीने घटनास्थळी पोहोचून आग विझविणे, नागरिकांचे प्राण वाचविणे आणि मालमत्तेचे नुकसान रोखणे ही अग्निशमन विभागाची प्रमुख जबाबदारी आहे. मात्र, याच विभागातील कर्मचाऱ्यांना झाडांच्या फांद्यांची छाटणी यांसारख्या अन्य कामांसाठी पाठविले जात असल्याने त्यांच्या मूळ कर्तव्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागात कंत्राटी पद्धतीने एकूण २० कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येक पाळीत साधारणतः सात कर्मचारी तैनात असतात. मात्र, यापैकी तीन ते चार कर्मचाऱ्यांना अनेकदा झाडांच्या फांद्यांची छाटणी यांसारख्या अन्य कामांसाठी पाठविले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाकडे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
समजा, अशा वेळी शहरात एखाद्या ठिकाणी आग लागली, तर मर्यादित मनुष्यबळाच्या आधारे तातडीने मदतकार्य कसे राबवायचे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आगीच्या घटनांमध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. अशा वेळी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि अग्निशमन यंत्रणेची सज्जता अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ कर्तव्यापासून दूर ठेवणाऱ्या कामांबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.
यासंदर्भात अग्निशमन अधिकाऱ्यांनी, अग्निशमन कर्मचाऱ्यांना अशा अन्य कामांसाठी पाठविणे योग्य नसल्याचे सांगितले. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तोंडी आदेश दिले जात असल्याने त्यांचे पालन करावे लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे अग्निशमन विभागाकडून आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने मदतकार्य करण्याची अपेक्षा केली जाते, तर दुसरीकडे याच विभागातील कर्मचाऱ्यांना अन्य कामांसाठी पाठविले जात असल्याचे चित्र समोर आले आहे. हरीओम मडावी यांच्या दुखापतीच्या घटनेनंतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करणे, कामांचे स्पष्ट नियोजन करणे आणि अग्निशमन दलाची आपत्कालीन सज्जता कायम ठेवणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.




Petrol Price




