विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराकडे वळावे : उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती तरुणांना व्हावी आणि त्यातून त्यांनी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, या उद्देशाने आयोजित प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराकडे वळावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले. एमएसएमई व विकास कार्यालयाच्या वतीने सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसी, लोणारा येथे आयोजित सहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते.
यावेळी विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, वेलनेस फॉरएव्हरचे अशरफ बिराण, एमएसएमईचे उपायुक्त संचालक व्ही. आर. सिरसाट, उपसंचालक योगेंद्र बघेल, सहाय्यक संचालक मनीष झा, माजी मंत्री अनिस अहमद, नगरसेवक अतुल कोटेचा आदी उपस्थित होते. राज्यमंत्री नाईक म्हणाले, शिक्षण हे जीवनातील महत्त्वाचे साधन असून विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करूनच रोजगाराच्या क्षेत्रात प्रवेश करावा. विशेषतः मुलींनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांच्याबाबत समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणे आवश्यक आहे.
तरुणांमध्ये बेरोजगारीबाबत चिंता असून, विद्यार्थ्यांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योग व स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध योजनांमध्ये अनुदानाची तरतूद आहे. मात्र, या योजनांची पुरेशी माहिती नसल्यामुळे तरुण त्याकडे वळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. हिवाळी अधिवेशनाच्या काळात डिसेंबरमध्ये तरुणांसाठी जॉब फेअर आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही राज्यमंत्री नाईक यांनी दिली. एमएसएमई क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करताना या क्षेत्रामुळे उद्योगांची आर्थिक स्थिती उन्नत करण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी यांनी तरुणांमधील बेरोजगारीच्या प्रश्नावर चिंता व्यक्त करत, अशा प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मंत्री अनिस अहमद यांनी केले. यावेळी आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कौशल्य विकास विभागाच्या प्रमाणपत्रांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.




Petrol Price




