जलनगरात सुरू होती अवैध मोहफुलांची भट्टी : रामनगर पोलिसांचा छापा, १,३४० लिटर सडवा जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील जलनगर परिसरातील कंजर मोहल्ल्यात घरांच्या आडोशाने अवैध मोहफुलांची गावठी दारू तयार करण्याचा आणि विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामनगर पोलिसांनी दोन घरांवर एकाचवेळी छापा टाकत तब्बल १ हजार ३४० लिटर दारू तयार करण्यासाठी ठेवलेला सडवा आणि ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. या कारवाईत दारू निर्मितीचे साहित्य मिळून एकूण १ लाख ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
२७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास रामनगर पोलिसांना जलनगर येथील कंजर मोहल्ल्यात दोन घरांमध्ये अवैध गावठी दारू तयार करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. दारू तयार करण्यासाठी लागणारा सडवा बॅरलमध्ये भरून ठेवण्यात आल्याचेही पोलिसांना समजले. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
पहिल्या कारवाईत बरखा रामप्रसाद कंजर हिच्या घरातून ७१० लिटर सडवा, ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि दारू निर्मितीचे साहित्य असा ७२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या निलू संतोष भाट हिच्या घरावरही पोलिसांनी छापा टाकला. तेथून ६०० लिटर सडवा, २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि निर्मितीचे साहित्य असा ६३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दोन ठिकाणांवरून एकूण १,३१० लिटर सडवा आणि ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी संबंधित महिला आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई), (फ), (ब) व (क) अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, बाबा नैताम, रामप्रसाद नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, ब्ल्युटी साखरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदिप गेडाम, पंकज पोंदे व सुरज शेडमाके यांनी केले.




Petrol Price




