शीतल माता गोविंदा पथकाचा सलग दुसऱ्यांदा दहीहंडी फोडण्याचा विक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळू मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर आयोजित भव्य दहीहंडी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात बाबुपेठ येथील शीतल माता गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा उत्तुंग मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडून १ लाख ५१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवत पथकाने नवा विक्रम प्रस्थापित केला.
महोत्सवाला खासदार प्रतिभा धानोरकर यांची विशेष उपस्थिती होती. प्रशासनाच्या सूचना आणि नियमांचे पालन करून डीजे वाजविल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. आगामी काळात येणाऱ्या सर्व सण-उत्सवांमध्ये नागरिक व मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच डीजे वाजवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, वरोरा नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, मूल नगराध्यक्षा एकता समर्थ, बल्लारपूर नगराध्यक्षा अल्का वाढई, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदा जेणेकर, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा राव, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे काँग्रेस गटनेते सुरेंद्र अडबाले, नगरसेवक तसेच विविध नगरपरिषदांचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. १८ वर्षांवरील महिलांसाठी झालेल्या रस्सीखेच स्पर्धेत टग ऑफ वॉर संघाने प्रथम क्रमांक पटकावत १० हजार रुपये व चषक मिळविला. इरई संघाने द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये व चषक, तर आझाद गोल्डन संघाने तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये व चषक पटकाविला.
५ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी भारतातील थोर महापुरुष या विषयावर वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यात शिफा पवार हिने प्रथम क्रमांकासह ५ हजार रुपये व चषक, संजीवन पवार याने द्वितीय क्रमांकासह ३ हजार रुपये व चषक, तर अहिल्या लालसरे हिने तृतीय क्रमांकासह २ हजार रुपये व चषक पटकाविला.
संध्याकाळी मुख्य आकर्षण ठरलेल्या भाऊंची दहीहंडी स्पर्धेत गोविंदा पथकांनी उत्साहात सहभाग घेतला. गोविंदा आला रेच्या गजरात मानवी मनोरे रचण्यात आले. अखेर शीतल माता गोविंदा पथक, बाबुपेठ यांनी थरारक कामगिरी करत दहीहंडी फोडली आणि १ लाख ५१ हजार रुपये रोख तसेच भव्य चषकाचा मान मिळविला. विजेत्या खेळाडू व गोविंदा पथकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक व न्यायालयाच्या नियमांनुसार आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून महोत्सवात डीजे वाजविण्यात आला. या नियमपालनाचा आदर्श इतर सण-उत्सवांमध्येही ठेवावा, असे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.
महोत्सवाला चंद्रपूर शहर व परिसरातील नागरिक, महिला आणि गोविंदा प्रेमींनी मोठी गर्दी केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट व बाळू मित्र परिवारच्या सदस्यांनी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे व सहभागी स्पर्धकांचे आभार अतुल वाघमारे यांनी मानले.




Petrol Price




