महत्वाच्या बातम्या

 डॉ. कलाम यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा : मोंटफोर्ट स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : स्वप्न पाहण्याची जिद्द, ती पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम आणि ज्ञान मिळविण्याची अखंड ओढ, हा संदेश देणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर येथील मोंटफोर्ट स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक विद्यार्थी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पुस्तकांशी मैत्री करण्याचा आणि डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनातून शिकण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून घेतला.

विद्यालयाच्या ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य ब्रदर प्रेम कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

शिक्षक घनश्याम बुरडकर यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती देताना त्यांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेले डॉ. कलाम हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी सांगितले. मोठी स्वप्ने पाहण्यासोबतच ती साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात विविध पुस्तकांचे वाचन केले. विशेषतः डॉ. कलाम यांच्या ‘विंग्स ऑफ फायर’ या आत्मचरित्राचे वाचन करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची ओळख करून घेतली. मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापराच्या काळात पुस्तक वाचनाची सवय जोपासण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

प्राचार्य ब्रदर प्रेम कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नियमित वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाचनामुळे केवळ ज्ञानात भर पडत नाही, तर विचारशक्ती विकसित होऊन व्यक्तिमत्त्वालाही आकार मिळतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज किमान ३० मिनिटे सामान्य ज्ञानविषयक पुस्तके वाचावीत, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. कलाम यांना आदर्श मानून शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जीवनात यश मिळविण्याचा संदेशही त्यांनी दिला.

शिक्षक घनश्याम बुरडकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तसेच आभार मानले. डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासोबतच मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिली.





  Print






Related Photos