आरोग्य उपसंचालकांची समग्र प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण सत्रास भेट

विदर्भ न्यूज प्रतिनिधी
प्रतिनिधी / वर्धा : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, दहेगाव गोसावी येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय समग्र प्राथमिक आरोग्य सेवा या प्रशिक्षण सत्रास नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.शशिकांत शंभरकर यांनी देऊन प्रशिक्षणाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी उपसंचालकांनी प्रशिक्षण सत्रातील विविध विषयांचे सादरीकरण, प्रशिक्षणाची पद्धत तसेच प्रशिक्षणार्थीचा सहभाग याबाबत माहिती घेतली. त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधत समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (सीपीएचसी) अंतर्गत प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात प्रभावीपणे वापरण्याचे आवाहन केले. तसेच प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक मार्गदर्शन करून प्रशिक्षण सत्राची पाहणी केली.
या भेटीप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजसिंह पवार तसेच समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (सीपीएचसी) प्रशिक्षणातील सर्व प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये प्राथमिक आरोग्य सेवा बळकटीकरण, आरोग्य संस्थांमधील सेवा गुणवत्ता, समुदायाच्या आरोग्य गरजांनुसार सेवा उपलब्ध करून देणे तसेच विविध आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.




Petrol Price




