महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा ५ नोव्हेंबरला होणार


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईद्वारा आयोजित महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ साठी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता या वेळेत एक सत्रात शहरातील शाळा, महाविद्यालयातील ६ उपकेंद्रावर परिक्षा होणार आहे.
आयोगाने परीक्षेकरीता जिल्हा केंद्र प्रमुख तथा परीक्षा प्रमुख म्हणुन निवासी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक केंद्राकरिता एक याप्रमाणे ६ उपकेंद्रावर प्रत्येकी एक उपकेंद्रप्रमुख आणि आवश्यक त्या प्रमाणात जिल्हाधिकारी व अन्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक, शिपाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी आणि परीक्षेसंबंधी कोषागार, प्रधान डाक कार्यालय, पोलिस विभाग इत्यादीशी समन्वय साधण्याकरीता समन्वयक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याशिवाय पर्यवेक्षणासाठी विशेष अधिकारी (भरारी पथक) यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे.
परीक्षेमध्ये कॉपी व गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याकरीता तसेच अशा प्रकारच्या घटना घडणार नाही, याकडे लक्ष पुरविण्यासाठी पोलिस विभाग, भरारी पथकास सूचना देण्यात आले आहेत. परीक्षा कालावधीत १४४ कलम लागू करण्यात आलेले असून परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल, पेजर, मायक्रोफोन, कॅमेरा, टॅब, लॅपटॉप, हेडफोन, स्मॉल कॅमेरा फिटेड ऑन वॉचेस, शर्ट बटन, पेन, रिंग्ज, स्पॉय कॅमेरा, स्मार्ट वाचेस, लेसेस, ब्लु टुथ आदी ईलेक्ट्रॉनिक स्वरुपाच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या संयंत्राचे वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
परीक्षेमध्ये कॉपीचा गैरप्रकार करणा-या घटनांची गंभीर दखल घेण्यात येणार असून अशा प्रकरणी संबंधितांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे व प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. तसेच परीक्षा केंद्रावरील उमेदवारांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार असुन कोविड १९ च्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विशेष आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा परीक्षा केंद्र प्रमुख यांनी कळविले आहे.
News - Bhandara