महत्वाच्या बातम्या

 आरमोरी : वैनगंगा नदीत बुडून १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूक प्रतिनिधी / आरमोरी : शहराजवळील वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या एका १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी ५:१५ वाजताच्या सुमारास घडली. विष्णू उर्फ वेदांत नंदकिशोर कुकडकर (वय १७, रा. ठाणेगाव, ता. आरमोरी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण आरमोरी व ठाणेगाव परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू हा यावर्षी आरमोरी येथील महाविद्यालयात बाराव्या वर्गात शिकत होता. रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तो आपल्या दोन मित्रांसोबत आरमोरीजवळील वैनगंगा नदीवर आंघोळीसाठी गेला होता. मित्र नदीपात्रात आंघोळ करत असताना, विष्णूचा पाय अचानक खोल पाण्यात घसरला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो काही क्षणांतच प्रवाहासोबत वाहून जाऊन पाण्यात बुडाला. विष्णू पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी नदीकडे धाव घेतली, तसेच आरमोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या पथकाने तातडीने नदीपात्रात उतरून शोधकार्य सुरू केले, मात्र पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्यामुळे काल बराच वेळ शोध घेऊनही मृतदेह हाती लागला नव्हता अखेर आज त्याच्या मृतदेह सापडला.

मृत विष्णूच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचे छत्र हरपले होते आणि त्यांच्या निधनानंतर आईने अत्यंत कष्टाने विष्णू व त्याच्या लहान भावाचा सांभाळ केला होता. विष्णू हा शिकून मोठा होईल आणि घराचा कर्ता पुरुष म्हणून आधार बनेल, अशी आशा कुटुंबाला होती; मात्र काळाने त्याच्यावर घाला घातल्याने या कुटुंबावरील दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण ठाणेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos