महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यातील १,६२७ अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण संसद चे आयोजन


- पोषण संसदेतून पोषण जनजागृतीचा जागर
- सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना व पोषण अभियानाच्या माध्यमातून माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी या भावनेला बळ देत जिल्ह्यातील सर्व १,६२७ अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण संसद हा अभिनव जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. सेवा संकल्प अभियानांतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

चला... एकत्र येऊ, पोषणासाठी विचार करू आणि कृती करू या संकल्पनेतून आयोजित पोषण संसदेमध्ये गरोदर माता, स्तनदा माता, ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालके, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, शिक्षक तसेच ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या पोषण संसदेत संतुलित आहार, बालकांची योग्य वाढ, माता व बालकांचे आरोग्य, सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पोषण, स्वच्छता, आरोग्यदायी सवयी तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध पौष्टिक व सकस आहार याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कुपोषणमुक्त समाज निर्मितीसाठी प्रत्येक कुटुंबाने पोषणाची जबाबदारी स्वीकारून पोषणाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचा संदेश देण्यात आला.

अंगणवाडी केंद्र हे केवळ बालकांच्या संगोपनाचे ठिकाण नसून बालक, माता आणि संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य व पोषणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे पोषणविषयक जनजागृतीमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थ यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

सुपोषणासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक -
जिल्ह्यातील सर्व १,६२७ अंगणवाडी केंद्रांमध्ये एकाचवेळी पोषण संसद आयोजित केल्यामुळे पोषणाचा संदेश गावागावात आणि घराघरात पोहोचविण्यास मोठी मदत झाली. सुपोषित कुटुंब – निरोगी समाज – विकसित भारत या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत प्रत्येक नागरिकाने पोषणविषयक सकारात्मक कृती करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले





  Print






Related Photos