महत्वाच्या बातम्या

 चोरी करून गुजरातमध्ये पळाला : सहा महिन्यांनी माजरीत परतताच पोलिसांच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ट्रकची बॅटरी चोरण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांच्या हातातून निसटलेला आरोपी तब्बल सहा महिने गुजरातमध्ये लपून बसला. मात्र, पोलिसांची नजर चुकवून तो पुन्हा माजरीत परतताच माजरी पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला अखेर जेरबंद केले. शौर्या राजकुमार केवट २१ वर्ष , रा. सिद्धार्थ वार्ड, माजरी कॉलरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

२० मार्च २०२६ रोजी रात्री माजरी कॉलरी येथील सब एरिया कार्यालयासमोरील खुल्या जागेत एमएच ४० ए.के. ४५९६ क्रमांकाचा ट्रक उभा करण्यात आला होता. चालक ट्रक उभा करून घरी गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत ट्रकची बॅटरी चोरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान नागरिकांना संशय आल्याने त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करून किसन कुमार रामस्वरूप निषाद याला पकडले. मात्र, त्याचा साथीदार शौर्या केवट घटनास्थळावरून पसार झाला.

चोरट्यांनी ट्रकची बॅटरी लंपास करण्याचा प्रयत्न करताना ट्रकच्या मागील बाजूची काचही फोडली. त्यामुळे सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळावर एमएच ३४ सीटी २९५५ क्रमांकाची मोपेड स्कुटी पोलिसांना मिळून आली. या प्रकरणी माजरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३/२०२६ दाखल करण्यात आले होते.

गुन्हा दाखल झाल्यानंतर शौर्या केवट पोलिसांना चकवा देत गुजरात राज्यात पसार झाला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. आरोपीच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून पोलिसांनी गोपनीय माहितीचे जाळे सक्रिय ठेवले. अखेर तो माजरी कॉलरी परिसरात परतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला माजरी शहरातून ताब्यात घेतले.

२३ सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याचा एमसीआर मंजूर केला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध चोरी तसेच महिलांशी संबंधित गुन्हे यापूर्वीही दाखल आहेत.

सहा महिने पोलिसांना हुलकावणी देत परराज्यात लपलेल्या आरोपीला अखेर त्याच्याच परिसरात परतल्यानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्याने या कारवाईची माजरी परिसरात चर्चा सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि. सुबोध वंजारी, श्रेणी पोउपनि. धनराज पंचोडबरीया आणि पोलीस अंमलदार अनिस शेख यांनी केली.






  Print






Related Photos