शेतीवरून परतताना काळाचा घाला : समोरासमोर धडकेत दोघांचा दुर्दैवी अंत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतीची कामे आटोपून गावाकडे परतणाऱ्या एका दुचाकीस्वारावर आणि गावातून शेताकडे निघालेल्या दुसऱ्या दुचाकीस्वारावर काळाने घाला घातला. पोंभूर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूर येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दि दि. २५ रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
चरणदास शेडमाके ४२ वर्ष आणि चरणदास पेंदोर ४५ वर्ष , दोघेही रा. चेक बल्लारपूर, अशी मृतांची नावे आहेत. चरणदास शेडमाके हे शेतीची कामे आटोपून दुचाकी क्रमांक एमएच ३४ डब्ल्यू ७४७९ ने गावाकडे परतत होते. त्याचवेळी चरणदास पेंदोर हे दुचाकी क्रमांक एमएच ३४ एई ०५७७ ने गावाकडून शेताकडे जात होते.
शंकर अडबाले यांच्या शेताजवळ दोन्ही दुचाकींची अचानक समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात चरणदास शेडमाके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर चरणदास पेंदोर गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना तातडीने पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी चरणदास शेडमाके यांना मृत घोषित केले. दुसरीकडे, गंभीर जखमी चरणदास पेंदोर यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात येत होते. मात्र, नियतीने त्यांनाही साथ दिली नाही. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
काही क्षणांपूर्वीपर्यंत आपल्या कामानिमित्त रस्त्यावर असलेले दोघेही दुचाकीस्वार काही वेळातच मृत्यूच्या दाढेत गेले. एकाच अपघातात दोन जीव गेल्याने चेक बल्लारपूर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




Petrol Price




