महत्वाच्या बातम्या

 मैत्रीच्या विश्वासाला सायबर फसवणुकीचा काळिमा! सात तरुणींच्या बँक खात्यांतून १ कोटींचे संशयास्पद व्यवहार : दोघांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत करणाऱ्या सात होतकरू तरुणींच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांच्या बँक खात्यांचा सायबर फसवणुकीसाठी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत उघडकीस आला आहे. मैत्रीच्या नात्यावर विश्वास ठेवून बँक खाती उघडणाऱ्या या तरुणींना आपण एका मोठ्या आर्थिक व्यवहारांच्या जाळ्यात अडकत आहोत, याची पुसटशी कल्पनाही नव्हती. त्यांच्या नावावरील सात बँक खात्यांतून तब्बल १ कोटी ४ लाख ५२ हजार ९९१ रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२६ मध्ये केदारनाथ सहलीदरम्यान धानोरा तालुक्यातील एका तरुणीची जुही विनायक मेश्राम हिच्याशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले आणि त्यातून जुहीने इतर तरुणींशीही जवळीक वाढवली. २० ऑगस्ट रोजी गडचिरोलीतील एका हॉटेलमध्ये तिने आपले बँक खाते होल्ड झाल्याचे सांगितले. ट्रेडिंगसाठी नवीन बँक खाती उघडण्याची विनंती तिने या तरुणींना केली. मैत्री आणि विश्वासापोटी तरुणींनी नवीन सिमकार्ड घेत महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आपापली खाती उघडली. मात्र, या खात्यांचा वापर नेमका कशासाठी होणार आहे, याची त्यांना कल्पनाच नव्हती.

या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा ६ ऑक्टोबर रोजी झाला. धानोरा तालुक्यातील एका तरुणीच्या घरी तिच्या बँक खात्यातून २० लाख रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याबाबत बँकेची नोटीस आली. ही नोटीस पाहून तरुणीच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्यानंतर इतर मैत्रिणींच्या खात्यांची तपासणी केली असता, त्यांच्या खात्यांतूनही लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले. सातही खात्यांतून एकूण १ कोटी ४ लाख ५२ हजार ९९१ रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले.

सायबर सुरक्षा जनजागृती मोहिमेदरम्यान म्यूल अकाउंट म्हणजेच दुसऱ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून संशयास्पद किंवा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करण्याच्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर या तरुणींना आपल्या खात्यांचा गैरवापर झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत गडचिरोली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणातील मुख्य आरोपी जुही विनायक मेश्राम (२३ वर्षे, रा. गडचिरोली) आणि तिचा साथीदार सात्विक दीपक सावडीया (२२ वर्षे, रा. रायगड, छत्तीसगड) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस भरतीसाठी मेहनत घेणाऱ्या आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणींना मैत्रीच्या विश्वासातून अशा आर्थिक व्यवहारांच्या जाळ्यात ओढले गेल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अनोळखी किंवा नव्याने झालेल्या ओळखीतील व्यक्तीच्या सांगण्यावरून बँक खाते उघडणे, नवीन सिमकार्ड घेणे किंवा स्वतःच्या खात्याचा वापर दुसऱ्याला करू देणे किती धोकादायक ठरू शकते, याची जाणीव या घटनेने पुन्हा करून दिली आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या बँक खात्याची माहिती, पासबुक, एटीएम कार्ड, सिमकार्ड किंवा बँक व्यवहारांची सुविधा दुसऱ्याच्या हाती देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.





  Print






Related Photos