गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात इसम जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी  /गडचिरोली :
 तालुक्यातील गोगाव येथील शेतकऱ्याचा २५ ऑगस्ट रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आज २७ ऑगस्ट रोजी पुन्हा तालुक्यातील राजगाटा चेक येथील इसमावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. जिवन जुवारे (६०) असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.  
२५ ऑगस्ट रोजी गोगाव येथील रामाजी चुधरी यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घटना ताजी असतांनाच  आज पुन्हा राजगाटा चेक येथील इसमावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आंबेशिवणी, अंबिटोल, भिकारमौशी, अमिर्झा, कळमटोला, धुंडेशिवणी, पिपरटोला, नवरगांव, चुरचुरा, कुऱ्हाडी, महादवाडी, गोगाव, दिभना, जेप्रा, राजगाटा चक, उसेगांव, मुरूमबोडी, बोथेडा, गिलगांव, खुर्सा, मुरमाडी या भागात नरभक्षक वाघाचा वावर आहे. आतापर्यंत या नरभक्षी वाघाने ११ लोकांचा बळी घेतला आहे तर वाघाच्या हल्ल्यात २ व्यक्ती जखमी झाले असून ४० ते ५० पाळीव जनावरे वाघाने फस्त केले आहे.
यापूर्वीच या परिसरातील नागरिकांनी वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी वनविभागाला केली होती. परंतु वनविभागाच्या वतीने कोणते ठोस पाऊल उचलेल्या गेले नाही. २३ ऑगस्ट रोजी उपवनसंरक्षक व वनसंरक्षक यांना वाघाचा बंदोबस्त करण्यात यावे असे निवेदनहि देण्यात आले होते. परंतु यावर वडसा व गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक यांनी कोणतेही ठोस पाउल न उचलल्यामुळे २५ ऑगस्ट रोजी गोगाव येथील रामाजी चुधरी यांचा बळी गेला. ‘त्या’ नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावे अन्यथा वनविभागाच्या कोणत्याही कर्मचारी व अधिकाऱ्यास परिसरात फिरू देणार नाही. तसेच १ सप्टेंबर पासून वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत असल्याचा इशारा काल २६ ऑगस्ट रोजी भारतीय जनसंसद तालुका जिल्हा संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला.
गोगाव येथील २५ ऑगस्टची घटना ताजी असतांनाच व काल नागरिकांच्यावतीने पत्रकाररीषद घेवून वनविभागाला तात्काळ वाघाचा बंदोबस्त न केल्यास १ सप्टेंबर पासून वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत असल्याचा इशारा दिला असतांनाही वनविभागाने कोणतेही ठोस पाउल न उचलल्याने आज पुन्हा नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात इसम जखमी झाल्याने मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होऊन प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-08-27


Related Photos