विद्यार्थ्यांच्या अडचणी बिनधास्तपणे मांडा : मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा - डॉ. अशोक उईके


- गडचिरोलीतील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला मंत्र्यांची अचानक भेट; सोयी-सुविधांचा घेतला सविस्तर आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भाजपाच्या संघटनात्मक बैठका तसेच विविध शासकीय उपक्रमांच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकजी उईके यांनी पोटेगाव बायपास परिसरातील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला अचानक भेट देत तेथील व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी वसतिगृहातील विविध सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासोबतच विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
वसतिगृहाला दिलेल्या या भेटीदरम्यान मंत्री डॉ. उईके यांनी केवळ प्रशासकीय पाहणी न करता विद्यार्थ्यांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. विद्यार्थ्यांशी हसतखेळत गप्पा मारत त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी समजून घेतल्या. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या येतात, वसतिगृहातील सुविधा पुरेशा आहेत का, तसेच शैक्षणिक वातावरणाबाबत त्यांचे काय मत आहे, याची त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली.
मीसुद्धा वसतिगृहात राहून शिक्षण घेतले; अडचणी बिनधास्त सांगा -
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. अशोक उईके यांनी आपल्या वसतिगृहातील शैक्षणिक जीवनाचा अनुभव सांगत विद्यार्थ्यांना आत्मविश्वास दिला. मीसुद्धा तुमच्यासारखाच वसतिगृहात राहून शिक्षण घेतले आहे आणि आज इथपर्यंत पोहोचलो आहे. मी तुमचाच आदिवासी मंत्री आहे. तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही समस्या बिनधास्तपणे मांडा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
तसेच, विद्यार्थ्यांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्यावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत येत्या १५ दिवसांत मी पुन्हा तुमच्या भेटीला येईन, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्र्यांनी दिलेल्या या आश्वासनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
पिण्याचे पाणी, स्वच्छता व भोजन व्यवस्थेची पाहणी -
मंत्री डॉ. उईके यांनी वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, भोजन व्यवस्था, निवासाची सुविधा तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सोयी-सुविधांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना नियमितपणे आणि गुणवत्तापूर्ण सुविधा मिळतात की नाही, याबाबत त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनही माहिती जाणून घेतली. याशिवाय विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडचणी, शैक्षणिक समस्या आणि वसतिगृहातील दैनंदिन व्यवस्थेबाबतच्या तक्रारी जाणून घेण्यावरही त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांनी कोणतीही अडचण मनात न ठेवता संबंधित अधिकाऱ्यांकडे तसेच आपल्यापर्यंत मांडावी, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. अशोक नेते यांच्याकडूनही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन -
यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनीदेखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य घडवावे आणि उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून घ्यावा, यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. मंत्र्यांच्या भेटीमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आपल्या समस्या थेट शासनाच्या प्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती -
या पाहणी व आढावा दौऱ्यादरम्यान माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी व कर्मचारी, तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत त्यावर तातडीने लक्ष देण्याचे निर्देश आणि आश्वासन देण्यात आल्याने मंत्र्यांच्या या अचानक भेटीची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा रंगली. विशेष म्हणजे, स्वतःच्या वसतिगृहातील शिक्षणाच्या अनुभवाचा दाखला देत विद्यार्थ्यांशी साधलेला डॉ. उईके यांचा संवाद हा औपचारिक पाहणीपेक्षा अधिक आत्मीय ठरला.




Petrol Price




