महत्वाच्या बातम्या

 पुरातन महाशिवलिंगाच्या दर्शनाने मन प्रसन्न : धार्मिक सोहळ्यात आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती


- लालपेठ येथे उत्तर भारतीय समाजाच्या वतीने आरती, अभिषेक, भजन संध्या व महाप्रसादाचे आयोजन; पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचीही उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतीय संस्कृतीत धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला अनन्यसाधारण महत्त्व असून, विविध धार्मिक उत्सव आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात भक्तिभाव, एकोपा व बंधुभाव वृद्धिंगत होत असतो. भगवान महादेवाची आराधना ही भक्ती, श्रद्धा आणि आत्मिक समाधानाचा मार्ग असून, अशा धार्मिक सोहळ्यांमुळे समाजातील नागरिकांना एकत्र येण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

लालपेठ, चंद्रपूर येथील राज्यातील सर्वात मोठ्या पुरातन महाशिवलिंग परिसरात उत्तर भारतीय समाज, चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आरती, अभिषेक, भजन संध्या आणि महाप्रसाद वितरणाचा भक्तिमय सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थिती लावून भगवान महादेवाचे दर्शन घेतले. तसेच आरती आणि अभिषेकामध्ये सहभागी होत श्रद्धा व्यक्त केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचीही विशेष उपस्थिती होती.

पुरातन महाशिवलिंगाला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असून, या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. भजन संध्या, आरती आणि अभिषेकाच्या माध्यमातून भाविकांनी भगवान महादेवाप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित हिंदी भाषिक समाजातील बांधव आणि भगिनींशी संवाद साधला. चंद्रपूर शहर हे विविध भाषा, धर्म आणि संस्कृतींचा सन्मान करणारे शहर आहे. प्रत्येक समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचा आदर राखत सर्वांनी एकोप्याने राहणे हीच आपल्या शहराची खरी ओळख आहे. अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजातील परस्पर प्रेम, आपुलकी, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव अधिक दृढ होतो, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे नेते प्रकाश देवतळे, तुषार सोम, रघुवीर अहिर, मन्ना महाराज, रामकृष्ण यादव, वीरेंद्र सिंग, रामपाल सिंग, कीर्तिवर्धन दीक्षित, प्रिन्स प्रसाद, सुदामा यादव, दशरथ सिंह ठाकूर, सुबोध चिकटे यांच्यासह उत्तर भारतीय समाजातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos