वाघ गावाच्या वेशीवर : मात्र वनविभागाचा अलर्टच वाजेना


- रत्नापूर परिसरात पट्टेदार वाघाचा वावर; शेतातील डस्टर पंप कुरतडून नेला, हायरायडर्स अलर्ट यंत्रणा ठरली निष्प्रभ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : परिसरातील रत्नापूरजवळ पट्टेदार वाघाने गावाच्या वेशीवर शिरकाव केल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या हालचालींची पूर्वसूचना मिळावी, यासाठी वनविभागाने लावलेली हायरायडर्स अलर्ट यंत्रणा मात्र ऐनवेळी वाजलीच नसल्याने तिच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाघ प्रत्यक्ष शेतशिवारात दिसूनही अलर्ट यंत्रणा सक्रिय न झाल्याने गावकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. ही घटना सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.
रत्नापूर येथील मारोती रामा ढोणे हे शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेले असता, शेतात ठेवलेला चार्जिंग डस्टर पंप त्यांना अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आला. वाघाने हा पंप कुरतडून काही अंतरापर्यंत ओढत नेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे परिसरात वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती ढोणे यांनी तातडीने वनविभागाला दिली.
दरम्यान, रत्नापूरजवळील नाचनभट्टी बेघर परिसरातील शेतात शामा चौधरी, दादाजी चौधरी आणि रोहित चौधरी यांना पट्टेदार वाघ प्रत्यक्ष दिसला. वाघ शेतशिवारात फिरताना दिसल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. वाघाच्या वावरामुळे शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनपथक पोहोचेपर्यंत वाघ पसार -
वाघ दिसल्याची माहिती वनविभागाला मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, वनविभागाचे पथक पोहोचेपर्यंत वाघ तेथून निघून गेला होता. त्यामुळे त्याचा थेट माग काढण्यात अडचणी निर्माण झाल्या. परिसरातील वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाकडून आवश्यक ती पाहणी करण्यात येत आहे.
अलर्ट यंत्रणा बंद असल्याने संताप -
वाघाच्या हालचालींची नागरिकांना पूर्वसूचना मिळावी आणि संभाव्य धोका टाळता यावा, यासाठी वनविभागाने परिसरात हायरायडर्स अलर्ट यंत्रणा बसविली आहे. मात्र, वाघ गावाच्या वेशीपर्यंत येऊन शेतात फिरत असतानाही ही यंत्रणा वाजली नसल्याने तिच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वाघासारख्या वन्यप्राण्याचा वावर असलेल्या परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीची कामे करतात. त्यामुळे वाघाच्या हालचालींची माहिती वेळेत मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अलर्ट यंत्रणा कार्यरत नसल्यास तिचा सुरक्षेच्या दृष्टीने अपेक्षित उपयोग होत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यंत्रणेची तातडीने तपासणी करून ती सुरळीत कार्यान्वित करावी, अशी मागणी होत आहे.
शिवटेकडीतील घटनेनंतर पुन्हा वाघाचा वावर -
काही महिन्यांपूर्वी शिवटेकडी परिसरात एका वाघिणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या पिलांना वनविभागाने सुरक्षितपणे हलविले होते. त्या घटनेनंतर आता पुन्हा याच भागात पट्टेदार वाघाचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
रत्नापूर आणि नाचनभट्टी बेघर परिसरात वाघाच्या हालचाली वाढल्याने वनविभागाने या भागात गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवावे आणि नागरिकांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे. विशेषतः शेतात जाणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.




Petrol Price




