भरधाव ट्रकची तरुणाला धडक : डोक्यावरून चाक गेल्याने २७ वर्षीय अतुलचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आई-वडिलांना भेटण्यासाठी जावयाच्या घरी आलेल्या २७ वर्षीय तरुणाचा भरधाव ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. जेवण आटोपून कामावर जाण्यासाठी पायदळ निघालेल्या तरुणाला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रकचे चाक थेट डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अतुल हरबा देशमुख (वय २७), रा. मुरसा, ता. भद्रावती असे मृत तरुणाचे नाव आहे. १ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास राजुरा तालुक्यातील साखर येथे घटना घडली.
अतुल हा ट्रकवर चालक म्हणून काम करीत होता. ३० ऑक्टोबर रोजी त्याचे वडील हरबा देशमुख व आई हे मुलगी आणि जावई प्रशांत झाडे यांच्या घरी मुक्कामी गेले होते. ३१ ऑक्टोबर रोजी अतुलदेखील आई-वडिलांना भेटण्यासाठी जावयाच्या घरी आला होता. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी दुपारी जेवण केल्यानंतर राजुरा येथे ड्युटीवर जात असल्याचे सांगून तो घरातून पायदळ निघाला.
दरम्यान, काही वेळातच अतुलच्या बहिणीला घराबाहेर साखरी खदानच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने अतुलला धडक दिल्याचे दिसले. तिने ही माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर वडील हरबा देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत अतुलचा मृत्यू झाला होता. ट्रकचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याची कवटी फुटली होती. या भीषण दृश्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
MH ३४ M ७०६२ क्रमांकाच्या ट्रक चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून अतुलला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.
कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेला अतुल पुन्हा कधीच घरी परतणार नाही, या विचाराने देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास राजुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे करीत आहे.




Petrol Price




