महत्वाच्या बातम्या

 गर्भपातासाठी दबाव, छळ अन् दुसरा विवाह : पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : माहेरून चार लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करणे, गर्भपात करण्यासाठी दबाव टाकणे, गर्भपात न केल्यास जीवे मारण्याची धमकी देणे आणि त्यानंतर पतीने दुसऱ्या महिलेसोबत विवाह करण्याची घटना ब्रम्हपुरी तालुक्यात समोर आली आहे. या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पदमापूर येथील लंकेश ऋशी मस्के (वय २६) याचा विवाह १५ मार्च २०२६ रोजी २३ वर्षीय युवतीसोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवस दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर लंकेश याने पत्नीच्या दिसण्यावरून तिला टोमणे मारण्यास सुरुवात केली. त्याने शेतीच्या कामासाठी नवीन हार्वेस्टर घेतला असून त्याच्या हप्त्यांसाठी माहेरून चार लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. या कारणावरून तिचा मानसिक छळ करण्यात आला. रात्रीच्या वेळी मारहाणही करण्यात आली.

पतीसोबतच सासरे ऋशी मस्के यांनीही हार्वेस्टरची किस्त भरण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणण्यास सांगितले. प्रकृती बिघडल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेतानाही माहेरच्या आर्थिक परिस्थितीवरून टोमणे मारण्यात आले. सासू कल्पना मस्के हिच्याकडूनही स्वयंपाकातील किरकोळ कारणांवरून टोमणे मारण्यात येत होते.

दरम्यान, विवाहितेला दिवस गेल्यानंतर पती लंकेश याने गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. ‘हे बाळ आपल्याला एवढ्या लवकर नको’, असे सांगत त्याने वारंवार गर्भपात करण्यास सांगितले. गर्भपात केला नाही तर जीवे मारण्याची धमकीही दिली. सासू-सासऱ्यांनीही गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला.

आत्या सासू शांता विश्वनाथ अरसोडे हिनेही पती लंकेशचे म्हणणे ऐकण्यास सांगितले. तसेच दीर सदाशिव नागो मस्के याने वडिलांच्या मालमत्तेतून पैसे घेऊन हार्वेस्टरची किस्त भरण्यासाठी देण्यास सांगितले.

१६ जुलै रोजी सोनोग्राफी व उपचारासाठी विवाहितेला ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून घरी आल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींनी गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. पतीने तिच्या पोटातील गर्भ मृत झाल्याचे सांगितले. गर्भामुळे जीवाला धोका असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे विवाहितेने गर्भपातासाठी संमती दिली आणि त्यानंतर गर्भपात करण्यात आला.

यानंतर पती लंकेश याने २२ ऑगस्ट रोजी झाडबोरी, ता. नागभीड येथील अस्मिता लैझे हिच्यासोबत डोलेगरगाव येथील महादेव मंदिर सेवा समितीच्या ठिकाणी दुसरा विवाह केला. या विवाहाची माहिती विवाहितेला २३ ऑगस्ट रोजी मिळाली.

संसार सुरू असतानाच पतीने दुसऱ्या महिलेसोबत विवाह केल्याने तसेच गर्भपातासाठी दबाव, मारहाण, मानसिक छळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याने विवाहितेने ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून लंकेश ऋशी मस्के, ऋशी मस्के, कल्पना ऋशी मस्के, सदाशिव नागो मस्के आणि शांता विश्वनाथ अरसोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेखलाल गौतम करीत आहेत.





  Print






Related Photos