गाडीची चावी देण्यास नकार दिल्याने युवकाच्या डोक्यावर काठीने वार


- बडेगाव येथील घटना; वादातून युवकाला मारहाण, रावणवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गाडीची चावी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाला काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव येथे गुरुवारी १२ सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजकुमार शेरसिंग पाचे (४०, रा. बडेगाव) हे गुरुवारी ग्राम बनाथर येथून आपल्या घरी परत जात होते. दरम्यान, गावातील मंडी चौकात त्यांना परमेश्वर प्रल्हाद पाचे (३०, रा. बडेगाव) आणि त्याचा जावई हे दोघे शेकोटीजवळ बसून आग शेकत असल्याचे दिसले. यावेळी परमेश्वरच्या जावयाने राजकुमार यांच्याकडे गाडीची चावी मागितली.
मात्र, संबंधित गाडी त्यांच्या साळ्याची असल्याने आपण चावी देणार नसल्याचे राजकुमार यांनी स्पष्ट केले. यावरून परमेश्वर पाचे याला राग आला. असे कशाला बोललास? असे म्हणत त्याने जवळच पडलेली काठी उचलून राजकुमार यांच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ वार केले. या मारहाणीत राजकुमार जखमी झाले.
या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर रावणवाडी पोलिसांनी शुक्रवारी १३ आरोपी परमेश्वर प्रल्हाद पाचे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१) आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार चौधरी करीत आहेत.




Petrol Price




