महत्वाच्या बातम्या

 बीआयटी बल्लारपूरमध्ये जागतिक अन्न दिनानिमित्त फूडनोव्हेट २K२६ उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधून बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बीआयटी) येथील अन्न तंत्रज्ञान विभागाच्या वतीने फूडनोव्हेट २K२६हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण अन्नपदार्थ निर्मिती आणि अन्न प्रक्रिया उद्योगाच्या रचनेशी संबंधित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना अन्न तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि औद्योगिक क्षेत्राच्या अपेक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संजय वासाडे, संचालक रजनीकांत मिश्रा, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. सत्यनारायण चांगला, डॉ. झेड. जे. खान, प्राचार्य श्रीकांत गोजे, ॲडजंक्ट प्रोफेसर एस. डी. पाटणकर, बी.टेक. विभागप्रमुख डॉ. प्रशांत वाटकर आणि पॉलिटेक्निक विभागप्रमुख प्रा. सोनी ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्णव जोशी यांनी केले.

या कार्यक्रमात इनोव्हेटिव्ह फूड प्रॉडक्ट डिझाईन आणि फ्लेश फूड प्लांट लेआउट मॉडेल डिझाईन या दोन स्पर्धा घेण्यात आल्या. बी.टेक. आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, तांत्रिक ज्ञान आणि सर्जनशीलतेला वाव देण्याच्या दृष्टीने या स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरल्या. दोन्ही स्पर्धांचे परीक्षण सहायक प्राध्यापक झाहिद अन्सारी, सहायक प्राध्यापक अगाथा विल्सन, डॉ. अर्चना निमकर, सहायक प्राध्यापक मोहसीन कुरेशी आणि सहायक प्राध्यापक अविनाश खांडेराव यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून डॉ. संगीता सरकार (हेड टॅलेंट ॲक्विझिशन, डीजीएम, आयबी ग्रुप, बंगळुरू) यांनी ‘फ्रॉम क्लासरूम टू इंडस्ट्री’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी १०४ विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून समोर आलेले निष्कर्ष मांडताना अन्न अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी बनविण्याच्या कामाला ७७ टक्के विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिल्याचे सांगितले. अन्नसुरक्षा, संशोधन व विकास (R&D) आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना विशेष रुची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

औद्योगिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून ताणतणावाच्या परिस्थितीत शांत राहणे आणि आत्मसात केलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष कामात सातत्याने उपयोग करणे ही कौशल्ये विकसित करणे आवश्यक असल्याचे डॉ. सरकार यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्यांवरही भर द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.

बी.टेक. अन्न तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन व विकास, गुणवत्ता हमी व गुणवत्ता नियंत्रण (QA/QC), उत्पादन व प्रक्रिया अभियांत्रिकी, तांत्रिक विक्री, नियामक कामकाज आणि ऑडिटिंग यांसारख्या क्षेत्रांत करिअरच्या विविध संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) तसेच भारतीय अन्न महामंडळ (FCI) यांसारख्या संस्थांमधील शासकीय सेवेच्या संधींबाबतही त्यांनी माहिती दिली.

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी उत्पादन पर्यवेक्षक, गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि स्वच्छता पर्यवेक्षक यांसारख्या पदांवर काम करण्याच्या संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पॉलिटेक्निकनंतर बी.टेक.च्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश घेऊन पुढील शैक्षणिक प्रगती साधता येते, असेही त्यांनी सांगितले. रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी अतिरिक्त कौशल्ये आत्मसात करावीत तसेच पायलट प्लांट आणि औद्योगिक उत्पादनाच्या मोठ्या स्तरावरील प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळविण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बी.टेक. अन्न तंत्रज्ञान विभागाच्या सहायक प्राध्यापक दिव्या कोरडे आणि अजय दुर्गे, पॉलिटेक्निकच्या प्रा. प्रियंका एरला आणि अनिकेत पैलवार यांच्यासह सहायक प्राध्यापक लिलेश पुस्तोडे, कृपासागर देव, मेघा हुमणे, सोनम राजभर आणि वैष्णवी ठाकूर यांनी परिश्रम घेतले. तसेच नितीन फुलझेले, नितीन आंदनकर, किरण बोबडे आणि सुषमा पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगदान दिले. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण विचारांसोबत औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष संधींची ओळख करून देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.





  Print






Related Photos