महत्वाच्या बातम्या

 सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम


- १७ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना पडताळणी अर्ज सादर करण्याची संधी; इच्छुक विद्यार्थ्यांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी /चंद्रपूर : शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर यांच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या कालावधीत विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सादर करून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. सिद्धार्थ एल. गायकवाड यांनी केले आहे.

शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये MHT-CET, NEET, JEE, MBA, B.Ed., Ph.D., B.Sc. Agriculture, B.Pharm., B.Sc. Nursing आदी प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. तसेच तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत असलेले व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थीही या मोहिमेचा लाभ घेऊ शकतात.

यासोबतच शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेत प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठीही विशेष कार्यवाही करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी आपला विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने तातडीने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावा.

अपूर्ण प्रकरणांसाठी तुटीपूर्तता शिबिर -
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी यापूर्वी ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज सादर केले आहेत. मात्र आवश्यक पुरावे किंवा कागदपत्रांच्या अभावामुळे ज्यांची प्रकरणे अपूर्ण अथवा तुटीमध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठीही १७ सप्टेंबर ते १७  ऑक्टोबर २०२६या कालावधीत विशेष ‘तुटीपूर्तता शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.

संबंधित विद्यार्थ्यांनी या कालावधीत आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्यावी. अर्जामध्ये काही त्रुटी अथवा आवश्यक कागदपत्रांची कमतरता असल्यास त्याची तातडीने पूर्तता करून प्रकरण पूर्ण करून घ्यावे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील प्रवेश प्रक्रियेत कोणताही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

त्यामुळे संबंधित विद्यार्थी व पालकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.





  Print






Related Photos